...तर 'पीएमपी'ची पुणे आणि पिंपरीमधील सेवा बंद पडणार

...तर 'पीएमपी'ची पुणे आणि पिंपरीमधील सेवा बंद पडणार

पुणे : थकबाकीचे पैसे एका आठवड्यात मिळाले नाही तर, पीएमपीच्या बसगाड्यांना करण्यात येणारा सीएनजी इंधनाचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस निगम लिमिटेडने (एमएनजीएल) एका पत्राद्वारे पीएमपीला दिला आहे. त्यामुळे सुरू झालेली पीएमपीची सेवा अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या 1422 बस आहेत. लॉकडाउनपूर्वी त्यांना दररोज सुमारे 30 लाख रुपयांचा सीएनजी पुरविला जात होता. परंतु, आता सीएनजीची थकबाकी सुमारे 38 कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे "एमएनजीएल' कंपनीही अडचणीत आली आहे. थकबाकीची रक्कम मिळावी म्हणून कंपनीने पीएमपी, दोन्ही शहरांतील महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापालिकांचे आयुक्त, खासदार गिरीश बापट यांच्याशीही संपर्क साधला. त्यांच्याकडेही बैठक घेतली. परंतु, अद्याप पैसे मिळाले नसल्याचे एमएनजीएलचे वाणिज्य व्यवस्थापक संतोष सोनटक्के यांनी सांगितले. थकबाकी असलेली रक्कम एक आठवड्यात मिळाली नाही तर, पीएमपीला पुरविण्यात येणारा सीएनजीचा पुरवठा बंद करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या बाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "दोन्ही महापालिकांकडून निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दोन्ही शहरांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त यांच्याकडे या बाबत पाठपुरावा सुरू आहे. या परिस्थितीतून ते नक्कीच मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे.'' 

कोरोनाचा लॉकडाउन शिथिल झाल्यावर पीएमपीची 3 सप्टेंबरपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली आहे. सध्या दररोज सुमारे एक लाख 25 हजार प्रवासी पीएमपीचा वापर करतात. तर, सुमारे 18 लाखांपर्यंत पीएमपीचे उत्पन्न पोचले आहे. सरत्या आर्थिक वर्षांत पीएमपीला सुमारे 424 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांकडून संचलनातील तुटीमधील आगाऊ रक्कम अनुक्रमे 110 आणि 71 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी पीएमपीने केली आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी पुरविलेल्या बसचेही 84 कोटी रुपये पीएमपीला अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे वेतन करण्याचीही पीएमपीला अडचण उदभवेल, अशी चिन्हे आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर "एमएनजीएल'ने इंधन पुरवठा थांबविण्याचा इशारा दिल्यामुळे पीएमपी प्रशासन अडचणीत आले आहे. 
एमएनजीएलची 19 कोटी रुपयांची थकबाकी निव्वळ सीएनजी पुरवठ्याबाबतची आहे तर, 19 कोटी रुपये हे पूर्वीच्या सध्याच्या रकमेवरील व्याज आहे. यातील किमान निम्मी रक्कम तरी तातडीने मिळाली तर, सीएनजी पुरवठा सुरळीत ठेवता येईल, असे 'एमएनजीएल' कंपनीचे म्हणणे आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com