राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक', कारण...

राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक', कारण...

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वीज ग्राहकांना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे भरमसाट विजबिले आल्याचा आरोप करीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, राजगुरूनगर उपविभागाचे, उपकार्यकारी अभियंता मनिष कडू यांच्या केबिनची आज दुपारी बाराच्या सुमारास तोडफोड केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉक डाऊन कालावधीतील वीज बिले अवास्तव आली असून, त्याबाबत सुधारणा करण्याची कार्यवाही, चार दिवसांत न केल्यास वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खेड तालुका मनसेच्या वतीने देण्यात आला होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली, हे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल न घेतल्यावरून वीज वितरण कंपनीच्या चांडोली येथील, उपविभागीय कार्यालयातील, उपकार्यकारी अभियंता कडू यांच्या केबिनची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी तेथील फर्निचरच्या काचा फोडल्या आणि खुर्च्यांची मोडतोड केली.

पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुका सचिव नितीन ताठे, खेड तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातील भरमसाट आलेली विजबिले त्वरित कमी करावीत, विजबिले दुरुस्ती करून मिळावीत आणि रीडिंग प्रमाणे महिन्यानुसार बिले मिळावीत, अशी मनसेची मागणी होती.

कोरोनामुळे लॉकडाऊन व बाजारपेठा बंद राहील्याने, गेली ५ महिने सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक छोटे मोठे व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत. तसेच शेतकऱ्यांची अवस्था तर खूपच वाईट झाली आहे. असे असताना लॉकडाऊनच्या काळातील, वाढीव विजबिले देऊन सरकार सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे. याबाबत खेड तालुक्यातील असंख्य ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्याने मनसेने आंदोलन हाती घेतले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अतिशय संथ आहे. घटना  घडून गेल्यानंतर तीन तास उलटूनही याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. वीज वितरण कंपनीचे अधिकारी तेथे बसून होते. अजून काहीच दाखल नाही, असे ठाणे अंमलदार एस एम घोडे यांनी सांगितले.  

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com