कार्यकर्त्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे -शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक १५ मधील मनसेच्या प्रचाराची सर्व धुरा आता कार्यकर्त्यांनीच खांद्यावर घेतली आहे. 

पुणे -शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभाग क्रमांक १५ मधील मनसेच्या प्रचाराची सर्व धुरा आता कार्यकर्त्यांनीच खांद्यावर घेतली आहे. 

प्रभाग क्रमांक १५ ‘ब’मधून ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे या मनसेच्या उमेदवार निवडणूक लढवत आहेत. चार दिवसांपूर्वी प्रचारादरम्यानच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले; परंतु रुग्णालयातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रचाराची तात्पुरती धुरा त्यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. मग कार्यकर्त्यांच्या फळीनेही पुढे सरसावत प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांचा मुखवटा घालून हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन विकासकामांचा प्रचार करत आहेत. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा दाखला देत या वेळेसही न चुकता विकासासाठी रेल्वे इंजिनाला मतदान करण्याचा आग्रह धरत आहेत. सदाशिव पेठ, मंडई परिसर, नारायण पेठ हा भाग कार्यकर्त्यांनी पिंजून काढला आहे. रणजित ढगे, प्रकाश गायकवाड, राजाभाऊ सूर्यवंशी, नागेश ढमाले, अभिषेक थिटे, संजय पासलकर, नीलम हरवडे, स्वाती गोखले आदी असंख्य कार्यकर्त्यांची फळी प्रचाराची ही मोहीम 

सांभाळत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे विविध गट तयार केले असून, यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय आहे. 

प्रसूतीमुळे रुग्णालयात असलेल्या ॲड. रूपाली यांना उद्या (ता. १४) रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले; तर सुटी मिळताच पुन्हा जोमाने प्रचार सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, ‘गेले चार दिवस मी प्रत्यक्ष जरी प्रचारात सहभागी नसले, तरी कार्यकर्ते आणि नागरिकांशी माझा थेट संपर्क आहे. त्यामुळे यशाबाबत खात्री आहे. पाणीपुरवठा, विकसित उद्यान, स्वच्छतागृहे, पोलिस चौकीसाठी इमारत, महिला बचत गटांसाठी हॉल, रस्ते आदी विकासकामे मी केली आहेत. नागरिकांच्या कोणत्याही गरजेच्याप्रसंगी उभी राहणारी व्यक्ती म्हणून प्रभागातील नागरिक मला ओळखतात.’’

Web Title: mns candidate rupali patil thombare