मला एक खून माफ करा: राज ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

"माझे सर्व नगरसेवक नागरिकांसाठी उत्तम काम करतात. झालेली विकासकामे टिकविण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. मात्र, काम करूनही पराभव पत्करावा लागला, तर विकासकामे कोणीच करणार नाही आणि उमेदवार निवडणुकांच्या तोंडावर केवळ थापा मारतील,''

पुणे : मोबाईल कॅमेऱ्यामुळे लोकांनी स्वत:च्या डोळ्यांतून बघणे सोडून दिले आहे. या कॅमेऱ्यांच्या त्रासामुळे मला झालेली विकासकामे व्यवस्थितपणे पाहता येत नाहीत. त्यामुळे आता मी राष्ट्रपतींना भेटून मला एक खून माफ करा, अशी विनंती करणार आहे. तो खून मोबाईलमध्ये कॅमेरा आणणाऱ्याचा करणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपरोधिकपणे सांगितले. 

मोबाईल कॅमेऱ्यामध्ये राज ठाकरे यांचे छायाचित्र काढण्याचा उत्साह उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांत होता. याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.

"माझे सर्व नगरसेवक नागरिकांसाठी उत्तम काम करतात. झालेली विकासकामे टिकविण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. मात्र, काम करूनही पराभव पत्करावा लागला, तर विकासकामे कोणीच करणार नाही आणि उमेदवार निवडणुकांच्या तोंडावर केवळ थापा मारतील,'' असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

कात्रज येथील प्रभाग क्रमांक 40मध्ये महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आणि कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक 27 मध्ये हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ती रहे ख्वाजा गरीब दवाखान्याचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर, युवराज बेलदरे, गफूर पठाण, माजी नगरसेविका आरती बाबर, रूपाली पाटील आदी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, "निवडणुका आल्या की राजकारण होते. मतदारसंघांची रचना बदलली जाते. त्याला न जुमानता मोरे यांनी विकासकामांचा धडाका कायम ठेवला आहे. माझे सर्व नगरसेवक उत्तम काम करत आहेत, हे मी अभिमानाने सांगतो. महापालिका जरी विकासकामे करीत असली, तरी ती नागरिकांच्या खिशातून होत असतात. याची जाणीव ठेवून विकास टिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.'' 

केवळ सहा महिन्यांत हे उद्यान उभारल्याचे मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कोंढवा येथील कार्यक्रमाप्रसंगी ठाकरे यांनी बाबर यांच्याकडून रुग्णालयाची माहिती घेतली. या रुग्णालयात अल्पदरात तपासणी आणि उपचार केले जातील. 150 प्रकारच्या तपासण्या करण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. 

Web Title: MNS chief Raj Thackeray statement in Pune