विरोधी पक्षनेतेपदावर मनसेचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी दावा केला आहे; तर याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारीच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी जाहीर केले आहे. 

पुणे - महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी दावा केला आहे; तर याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारीच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी जाहीर केले आहे. 

कॉंग्रेसमधून सहा नगरसेवकांना निलंबित करण्यात आल्याने त्यांची सदस्यसंख्या 29 वरून घटून 23 झाली आहे. कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सध्या 28 सदस्य आहेत. त्यामुळे मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी महापौर जगताप यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळावे म्हणून पत्र दिले. त्यात म्हटले आहे, की महापालिकेत कॉंग्रेसच्या सदस्यांपेक्षा मनसेची सदस्यसंख्या जास्त 

असल्याने महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद कायद्याप्रमाणे मनसेला मिळणे आवश्‍यक आहे. त्याची दखल घेऊन मनसेला तातडीने विरोधी पक्षनेतेपद द्यावे. दरम्यान, याबाबत महापौर जगताप यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ""विरोधी पक्षनेतेपदासाठी मनसेने दावा केल्याचे पत्र आज मिळाले आहे. याबाबतचे नियम आणि प्रक्रियेचा आढावा घेऊन गुरुवारी त्याचा निर्णय लगेचच जाहीर करण्यात येईल.'' 

अजित पवारांना साकडे 
कॉंग्रेसपेक्षा आपली सदस्यसंख्या जास्त झाल्याचे समजताच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहरप्रमुख हेमंत संभूस, अजय शिंदे यांच्यात विचारविनिमय झाला. त्यातून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे ठरले. महापालिकेत किशोर शिंदे यांनी पत्र दिल्यावर, नांदगावकर यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधून मनसेची मागणी त्यांच्या कानावर घातली. पवार यांनीही याबाबत अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

Web Title: MNS leader of the opposition claim