रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसच्या हातात 'हात'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी धंगेकर यांची ओळख आहे. धंगेकर यांचा नियोजित भाजप प्रवेश बापट यांच्यासाठीच अडचणीचा ठरत होता.

पुणे - मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात 21 फेब्रुवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी आज (सोमवार) धंगेकर यांनी मुंबईत काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. रवींद्र धंगेकर पाचव्यांदा नगरसेवक होण्यास इच्छुक आहेत.
 
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे विरोधक अशी धंगेकर यांची ओळख आहे. धंगेकर यांचा नियोजित भाजप प्रवेश बापट यांच्यासाठीच अडचणीचा ठरत होता. धंगेकरांबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल, असे बापट यांनी स्पष्टही केले होते. त्यांचा धंगेकरांच्या प्रवेशाला तीव्र विरोध होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेकडून धंगेकर यांनी बापट यांच्याशी जोरदार लढत दिली होती. अखेर धंगेकर यांनी भाजपची वाट सोडत काँग्रेसच्या हातात हात दिला आहे.

Web Title: MNS leader Ravindra Dhangekar enters Congress