Vasant More: वसंत मोरे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात? भाजपची डोकेदुखी वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Vasant More: वसंत मोरे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात? भाजपची डोकेदुखी वाढणार

पुण्यातील भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही ही जागा लढवण्याची तयारी दाखवली तर राष्ट्रवादीने पुण्यावर आपला दावा सांगितलेला आहे. अशातच मनसे नेते वसंत मोरे यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक शंभर टक्के लढवेन आणि विजयीही होऊ, असा विश्वास वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

'मला पक्षाने आदेश दिला तर 100 टक्के निवडणूक लढवेन. केवळ लढवणार नाही तर पुणेकरांच्या जोरावर ही निवडणूक 100 टक्के मारेल. मला त्याची खात्री आहे. माझी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता निवडणूक लागेल न लागेल काही सांगता येत नाही. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक लागली आणि राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुण्याची लोकसभा लढवेल, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

तर पुढे वसंत मोरे म्हणाले कि, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. इच्छा का नसावी? माणसाने स्वप्न पाहिली पाहिजे. कोरोना काळात मी मोठं काम केलं. त्याची पावती म्हणून पुणेकर मला सहकार्य करतील. म्हणून आमच्या पक्षाला संधी मिळाली तर आरोग्य आणि वाहतूक या विषयावर लढू शकतो. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही. कारण निवडणूक तळ्यातमळ्यात आहे. पण निवडणूक जाहीर झाली तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असं मोरे म्हणालेत.

2017ची पुणे महापालिकेची निवडणूक पाहिली तर मनसेने मध्यमवर्गीय उमेदवार दिले होते. कोणतंही मोठं कार्ड आमच्याकडे नव्हतं. पुण्यातील आमचं संपूर्ण मतदान 3 लाख 79 हजार होतं. या 3 लाख 79 हजार मतांचा ग्राफ पाहिला आणि आजची परिस्थिती पाहिली तर आम्ही जिंकू शकतो, असं मला वाटतं. गिरीश बापट यांना 6 लाख 30 हजार मतदान होतं. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 10 हजार मते मिळाली होती. म्हणून आता जर मनसे निवडणुकीत उतरली तर आम्ही चमत्कार घडवू शकतो, असंही त्यांनी म्हंटलं आहे.