Vidhan Sabha 2019 : मनसेचे नेते ‘वेट अँड वॉच’वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असतानाही शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

विधानसभा 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असतानाही शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी होणार की स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून ‘थोडे थांबा’ असा सल्ला मिळत असल्यामुळे सर्व हालचाली  थांबल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापन २००७ मध्ये झाली. त्यानंतर पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेऊन पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. सुरवातीच्या काळात पक्षाला यश मिळाले. मात्र, त्यानंतर मिळालेले यश पक्षाला टिकविता आले नाही. दरम्यान, पुणे शहरात पक्षाची लाखभर व्होटबॅंक असल्याचे सिद्ध  झाले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने उघडपणे मोदींचे समर्थन केले होते. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरता सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जेरीस आणण्याचे काम पक्षाच्या नेत्यांनी केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी वाढविलेल्या जवळिकीवरून विधानसभा निवडणुकीत मनसे दोन्ही काँग्रेसबरोबर जाणार, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता. त्यामुळे शहर मनसेच्या नेत्यांची त्यादृष्टीने मानसिकता तयार झाली होती. आघाडी झाली तर किमान कसबा, खडकवासला आणि कोथरूड या तीन मतदारसंघांवर दावा करावयाचा, अशी तयारी शहरपातळीवरील नेत्यांनी केली आहे. आघाडी नाही झाली, तरी शहरातील आठही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तीन ते चार मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे, अशी तयारी पक्षाने  केली आहे.

दरम्यानच्या कालावधीत पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्यापुढील अडचणी वाढल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून ‘थोडे थांबा’ असा सल्ला दिला गेला. त्यामुळे सर्वच पातळ्यांवरील हालचाली ठप्प झाल्या आहेत. 
पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यामुळे शहरपातळीवर मनसेच्या नेत्यांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश कधी आणि काय येणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leaders have taken on the role of wait and watch