मोबाईलमुळे मुलांचाच 'गेम'

Mobile-Game
Mobile-Game

पुणे - कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रिणींसमवेत बोलणे टाळून काही मुले, तरुण आपल्या मोबाईलमधील गेममध्ये तासन्‌तास बुडून जातात. एक दिवस त्यांच्या मोबाईलमधील ‘पब्जी’सारखी गेम त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते आणि बघता-बघता हसत्या-खेळत्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

हे चित्र मोबाईल गेममुळे जिवानिशी गेलेल्या संतोष माळी (पेरणे फाटा, पुणे), रितीक कोलारकर (उमरेड, नागपूर) यांच्या कुटुंबातीलच नाही, तर ‘व्हर्च्युअल’ जगामुळे स्वतःचे जीवन संपविणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील कित्येक मुलांच्या कुटुंबातीलही आहे. इतकेच नाही, तर मोबाईल गेमच्या आहारी गेलेली हीच मुले, तरुण स्वतःच्याच नव्हे, तर कुटुंबातील अन्य सदस्यांच्याही जिवावर उठत असल्याचे भयावह वास्तव निर्माण झाले आहे.

कुटुंबातून, समाजातून प्रोत्साहन मिळत नाही, कोणी दखल घेत नाही, म्हणून नैराश्‍यग्रस्त झालेली मुले ‘ब्लू व्हेल’, ब्लॅक पॅंथर’,  ‘पबजी’ यांसारख्या मोबाईल गेममध्ये स्वतःला गुंतवून घेतात. तिथेच गेममधील एक-एक टप्पा पार केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळत जाते. मग तहानभूक, वेळकाळेचे भान विसरून जास्तीत जास्त वेळ ही मुले मोबाईल गेम खेळण्यात गुंतल्याचे चित्र आपल्या अवतीभोवती दिसते. ‘पबजी’मधील ‘प्लेअर अननोन बॅटलग्राउंड’ या हिंसक प्रकारामुळे मुलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या आजारी पाडत असल्याचे वास्तव आहे. याच पद्धतीने हळूहळू मोबाईल गेमच्या आहारी जाऊन काही मुले आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याची सद्यःस्थिती आहे. 

‘मुलांना मोबाईल वापरास देताना पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे. मोबाईल गेमच्या आहारी जाणाऱ्या मुलांचे दैनंदिन वागणे बदलून ती अविवेकी होतात. त्यातूनच त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. हे टाळण्यासाठी कुटुंबामध्ये मुलांशी संवाद वाढविला पाहिजे.’’ 
- सुनुल गौडा, मानसोपचारतज्ज्ञ

‘‘मोबाईल गेम धोकादायक बनवून मुलांना आकर्षित केले जाते. काही गेम त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे मोबाईल गेमचा अतिरेक होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.’’ 
- योगेश ठाणगे, सायबर तज्ज्ञ

मोबाईल गेममुळे मुलांबाबत घडलेल्या घटना 
* ऑक्‍टोबर २०१८  -  दिल्ली - पबजी खेळण्यास मज्जाव केल्याने मुलाने आई, वडील व बहिणीचा खून केला.  
* ४ फेब्रुवारी २०१९ -  मुंबई  - पबजीसाठी नवीन मोबाईल न दिल्याने १८ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
* २४ मार्च २०१९   - तेलंगणा - सलग ४५ दिवस मोबाईल गेम खेळल्याने तेलंगणामध्ये २० वर्षीय मुलाचा मृत्यू
* ३ एप्रिल २०१९    - तेलंगणा - आईने पबजी खेळण्यास मज्जाव केल्याने १६ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या  
* १३ जुलै २०१९   -  नागपूर   - दिवसभर पबजी गेम खेळल्यामुळे १९ वर्षीय मुलाचा मृत्यू
* १८ जुलै २०१९   -  पुणे     - मोबाईल गेम खेळणाऱ्या पेरणे फाटा येथील १९ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी सायबर पोलिस मदतीचा हात नक्कीच देतील. पालकांनी सायबर पोलिसांशी आवर्जून संपर्क साधावा. 
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com