ज्येष्ठांना मिळतेय मॉडेलिंगची संधी

ज्येष्ठांना मिळतेय मॉडेलिंगची संधी

पुणे - मॉडेलिंग म्हटलं, की साहजिकच तरुण चेहरा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आता मॉडेलिंगच्या क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात येऊ लागलेत. काय, आश्‍चर्य वाटतंय ना! पण, कला महाविद्यालयांमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांना ‘मॉडेलिंग’ची अधिकाधिक संधी मिळत असल्याचे दिसून येते.

कला महाविद्यालयांमध्ये चित्रकला, शिल्पकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू किंवा व्यक्ती समोर ठेवून चित्र रेखाटण्याचे किंवा शिल्प साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात तासन्‌-तास एकाच जागी बसणारी व्यक्ती अपेक्षित असते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित केले जातेय. खासकरून फाइन आर्टस्‌च्या वर्गांसाठी त्यांना बोलावले जाते. रेखाचित्र काढताना चेहऱ्यावरील हावभाव, शरीराची ठेवण पेन्सिल आणि रंगांच्या साहाय्याने टिपण्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा, म्हणून ज्येष्ठ नागरिक ‘मॉडेल’ बनत आहेत. या वेळी त्यांची विशेष काळजी घेतली जाते. चित्र काढायला किंवा मूर्ती बनवायला विद्यार्थी कलाकारांना तासन्‌ तास लागतात. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना काही वेळांचा ब्रेक दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माणसांची चित्रे, त्यांच्यातील वैशिष्ट्ये रेखाटताना वैविध्य असावे, म्हणून वर्षाला ७० ते ८० मॉडेल्स्‌ची गरज असते. यात तरुणांचे प्रमाणही असते. मात्र, तरुण मॉडेल्स खूप वेळ स्तब्ध बसायला कंटाळतात. त्याशिवाय मानधनही ते वाढवून मागतात. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक मॉडेल म्हणून बोलावल्यास ते एकाच जागी खूप वेळ स्तब्ध बसण्यास तयार असतात आणि मिळणाऱ्या मानधनात समाधानीही असतात. म्हणून अनेक कला महाविद्यालयांमध्ये  त्यांना संधी दिली जाते. 

चार वर्षांपासून महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांना मॉडेल म्हणून संधी दिली जात आहे. विद्यार्थ्यांचे चित्र पूर्ण होईपर्यंत एकाच जागेवर एकाच स्थितीत बसण्याची क्षमता ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक असते. दर वर्षी १० ते १२ ज्येष्ठ नागरिकांना संधी दिली जाते.
- दत्तात्रय ठुबे, प्राचार्य, साई चित्रकला महाविद्यालय

कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॉडेलिंग करण्यातून समाधान मिळते. मुलांमध्ये वेळ कसा जातो, हे कळतही नाही. ‘मॉडेलिंग’ करीत असल्याचा आनंद मिळतो.
- जगन्नाथ विसापुरे, ज्येष्ठ नागरिक 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com