नंबर १ साठी ७,00,000

पीतांबर लोहार
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव सुरू झाला..., दोघांमध्ये चढाओढ लागली... आणि अखेर एकाने ‘नंबर वन’ पटकविला... त्यासाठी मोजले तब्बल सात लाख रुपये.

पिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव सुरू झाला..., दोघांमध्ये चढाओढ लागली... आणि अखेर एकाने ‘नंबर वन’ पटकविला... त्यासाठी मोजले तब्बल सात लाख रुपये.

हौसेला मोल नाही, असे म्हणतात. मग, ती हौस आलिशान बंगल्याची असो वा मोटारीची, वाहनासाठी ‘लकी नंबर’ची असो वा ‘चॉइस नंबर’ची. त्यासाठी हौशी लोक काहीही करायला तयार असतात. असाच एक प्रसंग पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन क्रमांकाच्या नवीन मालिकेतील क्रमांक घेण्यासाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत बघायला मिळाला. नवीन मालिकेतील एक क्रमांक मिळविण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये चढाओढ लागली. त्या क्रमांकासाठी नियमित किंमत चार लाख रुपये जाहीर केली होती. त्यामुळे साहजिकच चार लाखांच्यापुढे बोली सुरू झाली. बोली लावणाऱ्या दोघांना तो क्रमांक आपल्या आलिशान गाडीसाठी हवा होता.

अखेर मर्सिडीज बेंझ कंपनीची मोटार घेतलेल्या व्यक्तीने ‘नंबर वन’साठीच्या हौसेचे मोल लावले तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत. नियमित शुल्क चार लाख आणि हौसेचे मोल तीन लाख असे सात लाख रुपये भरून त्यांनी ‘नंबर वन’ पटकविला. 

चॉइस नंबरचे साडेसात कोटी
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागात पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, जुन्नर, आंबेगाव व मावळ तालुक्‍यांचा समावेश होतो. गेल्या एप्रिलपासून ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आठ महिन्यांत १० हजार ३२७ वाहनांसाठीच्या चॉइस नंबरपोटी सात कोटी ५० लाख ७९ हजार रुपये उत्पन्न आरटीओला मिळाले आहे. त्यात सर्वाधिक दोन हजार ८६ वाहने आणि सर्वाधिक एक कोटी ७५ लाख दोन हजार ५०० रुपये उत्पन्न ऑक्‍टोबर महिन्यातील आहे. त्या खालोखाल नोव्हेंबर महिन्यात एक हजार २४२ वाहनांच्या चॉइस नंबरपोटी एक कोटी ११ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

 

Web Title: Modern Vehicle Choice Number Auction RTO Revenue