मोदी कॅप्टन, मी बॅट्‌समन - आठवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उस्ताद आहेत. आयपीएलमध्ये धडाधड रन काढणारे ते कॅप्टन आहेत. मी पण चांगला बॅट्‌समन आहे. त्यामुळे आम्ही २०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

नरेंद्र मोदी दलितविरोधी नाहीत, त्यामुळे एनडीएसोबत जाण्यामध्ये दलित समाजाचे हित आहे, असे सांगत आठवले यांनी शिवसेना-भाजप यांची भविष्यातही युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. शिवसेनेची नाराजी दूर व्हावी, यासाठी मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे व मोदी यांच्यात लवकरच भेट घडवून आणू, अशी माहिती आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ‘‘देशामध्ये जातिवाद जिवंत राहिला तो काँग्रेसमुळेच. काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रलंबित राहिलेले प्रश्‍न मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केले आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा प्रचार सातत्याने काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्याकडून होत आहे; मात्र मोदी आमच्या सर्व मागण्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे ते दलितविरोधी निश्‍चितच नाहीत.’’

मोदी-उद्धव भेट होणार? 
आठवले म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करायचा असेल तर भाजप-शिवसेनेने एकत्र राहावे. शिवसेनेने भाजपपासून वेगळे होण्याची भूमिका घेणे हे शिवसेनेच्या फायद्याचे नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेविरोधातले ते पाऊल ठरेल. बाळासाहेब ठाकरेंची आठवण ठेवायची असेल तर भाजपसोबत राहण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला पाहिजे. काही वाद असतील तर ते एकत्र बसून मिटविले पाहिजेत.’’

शिवसेनेच्या नाराजीचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला आहे. शिवसेनेची नाराजी काय आहे, याबद्दल उद्धव ठाकरे यांना एकदा दिल्लीला बोलवून चर्चा करा, त्यांची नाराजी दूर करणे नितांत आवश्‍यक आहे, असे मोदी यांना सांगितले आहे. महाराष्ट्रातले राजकारण यशस्वी करण्यासाठी आणि दिल्लीतील सरकार टिकविण्यासाठी शिवसेनेसारख्या पक्षाची एनडीएला आवश्‍यकता आहे, असेही आठवले यांनी सांगितले. 

आठवले म्हणतात...
बिगबॉसमध्ये जाण्यासाठी आता मला वेळ नाही. मीच ‘बिगबॉस’ आहे. 
बढत्यांमध्ये आरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी. त्याबाबत पंतप्रधानांकडून आश्‍वासन मिळाले. 
अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याला धक्का लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही.
फेरविचार याचिकेवर विपरित निकाल आला तर वटहुकूम काढू.
भाजप-शिवसेना एकत्र आल्यास मी कोठूनही निवडून येईन; मात्र दक्षिण मुंबई, शिर्डी मतदारसंघाला प्राधान्य.
भाजप-सेना एकत्र न आल्यास रामटेक मतदारसंघाला प्राधान्य देईन.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागांपुढे जाईल अशी परिस्थिती नाही. 
राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केले तरी इतक्‍या लवकर पंतप्रधान होण्याची संधी त्यांना मिळणार नाही.
उत्तर प्रदेशात भाजपला ५० जागा मिळतील.

Web Title: Modi Captain I am batsman - Ramdas Athawale