मोदी, फडणवीस यांच्या घोषणा फसव्या 

मोदी, फडणवीस यांच्या घोषणा फसव्या 

पुणे - राज्य सरकारची अपयशी कामगिरी लपविण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेते परस्परांवर टीका करून निवडणूक प्रचाराची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न करत आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना केली. राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेत नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साऱ्या घोषणा फसव्या आहेत. त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावरील विश्‍वास उडाला आहे. मतदारांना कॉंग्रेस पक्ष हा विश्‍वासार्ह पर्याय वाटत असल्याने पुणे व पिंपरीतील सुजाण मतदार कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे उभा राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

प्रश्‍न : पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर झालेल्या आघाडीबाबत तुम्ही समाधानी आहात का? 
उत्तर : आघाडी करायची नाही, असाच निर्णय सुरवातीला झाला होता; मात्र मी मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसांतच आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. माझ्या एकट्याच्या विरोधाचा विषय नव्हता. पक्षाच्या निर्णयाप्रमाणे काही ठिकाणी आघाडी झाली. ज्या ठिकाणी आघाडी झाली, तेथेही ठरल्याप्रमाणे काही होताना दिसत नाही. पुण्याची जबाबदारी माझ्याकडे नाही. उमेदवार निवडीपुरते काम माझ्याकडे होते; मात्र आता आम्ही चांगली लढत देऊ. पुणेकरांना कॉंग्रेसबद्दल विश्‍वास वाटतो. त्यामुळे पक्षाला चांगले यश मिळेल. 

प्रश्‍न : विधानसभेच्या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर आलेला नाही. शहरात पक्षाला मोठा जनाधार आहे; मात्र एकजिनसी नेतृत्व नाही, असे वाटते का? 

उत्तर : नेतृत्व नाही, असे म्हणता येणार नाही. राज्यात नगरपालिका निवडणुकांत पक्षाला चांगले यश मिळाले. प्रत्येक जिल्ह्यात जास्त क्षमतेने काम सुरू आहे. पक्षाला पुण्यात परंपरागत मोठा मतदार आहे. त्यामुळे पुण्यात अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारचा नाकर्तेपणा जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करू. 

प्रश्‍न : पुण्यात कॉंग्रेसला एकमुखी नेतृत्व का मिळत नाही? 
उत्तर : पुण्यातील कॉंग्रेसजन एकत्र आहेत. कोणतेही मतभेद नाहीत. शहरात पक्षाला मोठा जनाधार आहे, मोठा इतिहास आहे. मतदार पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. मतदानाच्या माध्यमातून ते समोर येईलच. 

प्रश्‍न : राज्यात मुदतपूर्व निवडणुकांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार बोलले आहेत. यावर आपले मत काय? 

उत्तर : मुदतपूर्व निवडणुका होतील, असे त्यांनी म्हटल्याचे वाचनात आले; मात्र शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत निश्‍चितपणे विश्‍वास वाटत नाही. मुदतपूर्व निवडणुकांबाबत पवार यांनी बोलल्यानंतर राजकीय वर्तुळात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली; मात्र अशी शक्‍यता मला वाटत नाही. निवडणुका झाल्याच तर पक्ष म्हणून आम्ही केव्हाही तयार आहोत. 

प्रश्‍न : तुमच्यामुळे सत्ता गेली या राष्ट्रवादीच्या आरोपाबाबत काय वाटते? 

उत्तर ः मला असे वाटत नाही. कारण, त्या पद्धतीची कोणतीच कृती माझ्याकडून झाली नाही. दोन गोष्टी मी केल्या. एक म्हणजे राज्य सहकारी बॅंकेची बरखास्ती. बॅंकेची स्थिती पाहता तो निर्णय आवश्‍यक होता; मात्र त्यात केवळ राष्ट्रवादीचे नेतेच होते, असे नाही तर सर्व पक्षांचे नेते होते. दुसरा निर्णय सिंचन प्रकल्पांचा. सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झाला, असे मी कधी म्हटले नव्हते. तसे वाटत असते तर मी त्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली असती. आर्थिक स्थितीचा अंदाज न घेता मोठमोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले, इतकाच माझा आक्षेप होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com