कॉंग्रेसमुक्त भारतला संघाचा रेड सिग्नल? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या "कॉंग्रेसमुक्त भारता'च्या मोहिमेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी "रेड सिग्नल' दाखविला. कॉंग्रेसमुक्त भारताची भाषा राजकारणात चालते, संघात नाही. राष्ट्रबांधणीच्या कार्यात आमचे विरोधकही आमचे सहप्रवासी आहेत,'' अशा शब्दांत भागवत यांनी लोकशाहीतील विरोधी पक्षाच्या अस्तित्वाला महत्त्व दिले, तर सत्ताधारी भाजपला कानपिचक्‍या दिल्या. 

भाजपने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत "कॉंग्रेसमुक्त भारत' निर्माण करण्याची घोषणा केली. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही मोहीम हाती घेतली होती. लोकसभेपाठोपाठ गेल्या चार वर्षांत विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये या मोहिमेला यश मिळाले. सध्या कॉंग्रेसकडे तीन, तर भाजपकडे 22 राज्यांमध्ये थेट किंवा स्थानिक पक्षाशी युतीद्वारे सत्ता आहे. कॉंग्रेसकडे असलेल्या तीन राज्यांपैकी कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापाठोपाठ, पश्‍चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होत आहेत, तर पुढील वर्षाच्या प्रारंभीच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठीही भाजपने "कॉंग्रेसमुक्त'चाच नारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. 

""राष्ट्राच्या उभारणीसाठी चाललेल्या प्रयत्नांची दिशा ही सर्वसमावेशक असली पाहिजे. राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एकाच्या कर्तृत्वाचे फळ नसते. आम्हाला सगळा समाज संघटित करायचा आहे. "मुक्त'ची भाषा राजकारणात चालते; आम्ही संघामध्ये ती मुळीच करत नाही,'' असे भागवत यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या "एकाधिकारशाही' कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले पक्षांतर्गत विरोधकांसह अन्य पक्षांतील विरोधकांना भागवत यांच्या या वक्तव्यामुळे बळ मिळणार आहे. 

रा. स्व. संघाने सक्रियता दाखविली नाही तर निवडणुकीत भाजपचा पराभव होतो, असे म्हटले जाते. 2004 च्या निवडणुकांमध्येही संघाने भाजपला पूरक सहभाग न दाखविल्यामुळे पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही संघाची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळेच सरसंघचालकांनी दिलेला "सर्वसमावेशकते'चा सल्ला भाजप कितपत गांभीर्याने घेईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: mohan bhagwat RSS BJP Congress-free India