Loksabha 2019 : पक्षावर निष्ठा ठेवली तर फळ मिळते : मोहन जोशी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस मल्लिलार्जुन खर्गे आदी नेत्यांचे मी आभार मानतो. काँग्रेस पक्षामध्ये कधीही कोणताही भेद न करता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते, हे माझ्या उमेदवारीवरून सिद्ध झाले आहे. पुणे शहराची परंपरा आणि पुणेकरांची बांधिलकी म्हणून गेली 40 वर्षे मी काम करत आहे.

पुणे : काँग्रेसने पुण्यासारख्या शहरातून माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली याबद्दल मी आभार मानतो. पक्षावर निष्ठा ठेवली तर त्याचे फळ मिळते, असे पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या उमेदवारीची सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घोषणा केली. गेले आठवडाभर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू होते. जोशी यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून शहरात उमेदवारी मिळाली होती. 

मोहन जोशी म्हणाले, ''मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस मल्लिलार्जुन खर्गे आदी नेत्यांचे मी आभार मानतो. काँग्रेस पक्षामध्ये कधीही कोणताही भेद न करता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते, हे माझ्या उमेदवारीवरून सिद्ध झाले आहे. पुणे शहराची परंपरा आणि पुणेकरांची बांधिलकी म्हणून गेली 40 वर्षे मी काम करत आहे. आजपर्यंतच्या कामाची पावती म्हणून पुणेकर मला मतदान करतील आणि मला लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ही ऐतिहासिक निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सध्या धोक्यात आहे. म्हणून या निवडणुकीत सर्वांनी सहभागी होऊन लोकशाहीला बळकट करावे व मला सहकार्य करावे ही विनंती करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.'' 

काँग्रेस पक्षासाठी सुमारे 45 वर्षांहून अधिक काळ काम करीत आहे, त्याची दखल घेत पक्षाने कार्यकर्त्यांना चांगला संदेश दिला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने या निवडणुकीत नक्कीच विजयी होईन, असा मला विश्‍वास आहे. 
- मोहन जोशी, काँग्रेसचे उमेदवार   

Web Title: Mohan Joshi statement after declare candidate for Pune Loksabha constituency