esakal | खंडणी मागणाऱ्या टोळीवर बारामतीत मोका
sakal

बोलून बातमी शोधा

crime

खंडणी मागणाऱ्या टोळीवर बारामतीत मोका

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : हॉटेलमध्ये खंडणी मागून दमदाटी करणाऱ्या बारामतीतील टोळीविरुध्द विशेष पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया यांनी मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा) कारवाईस मान्यता दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज ही माहिती दिली. येथील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहा गार्डन या हॉटेलव येत दमदाटी करुन दारु पिऊन मारहाण करत दर महिना 25 हजार रुपये हप्त्याची मागणी करणा-या नितिन बाळासाहेब तांबे (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), आमिन दिलावर इनामदार (कसबा, बारामती), गणेश संजय बोडरे (रा. बारामती) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

वरिल तिघांसह आणखी दोघांनी बारामती शहर व परिसरात खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी मागणे अशा स्वरुपाचे 13 गुन्हे संघटीतपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांवर मोकाअंतर्गत कारवाई होण्यासाठी विशेष पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या सर्वांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेता मोकाचा प्रस्ताव पोलिस महानिरिक्षकांनी मंजूर केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरिक्षक मुकुंद पालवे, पोलिस कर्मचारी अविनाश दराडे, अतुल जाधव, अंकुश दळवी यांनी या बाबत कारवाई केली होती. पोलिस अधीक्षकांनी या कारवाईबद्दल 15 हजारांचे पारितोषिकही जाहीर केले आहे.

बारामतीत 120 आरोपी गजाआड-उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून बारामती पंचक्रोशीतील 18 गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द 18 मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करुन आजपर्यंत 120 आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी केली आहे. राज्यात एका उपविभागात इतक्या मोठ्य प्रमाणावर मोकाअंतर्गत कारवाईची राज्यातील ही एकमेव घटना आहे.

हेही वाचा: जुन्नर : लावला लाल कांदा पण निघाला पांढरा कांदा

loading image