पैशांसोबतच चहा, बिस्किटांची सोय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - सुटीचा दिवस असल्यामुळे रविवारी सकाळपासून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅंकांबाहेर रांगा लावलेल्या दिसून आल्या. बॅंकांना सोमवारी सुटी असल्यामुळे आणि रविवारी कामकाज सुरू असल्यामुळे आज (ता. 13) मोठ्या प्रमाणावर बॅंका व पोस्ट कार्यालयांबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, आयडीबीआय आणि बॅंक ऑफ बडोदासारख्या अनेक बॅंकांनी नागरिकांसाठी खास पिण्याच्या पाण्याची, चहा, बिस्किटे तसेच बसण्याची व्यवस्था केल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण नाहीसे झाले. 

पुणे - सुटीचा दिवस असल्यामुळे रविवारी सकाळपासून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅंकांबाहेर रांगा लावलेल्या दिसून आल्या. बॅंकांना सोमवारी सुटी असल्यामुळे आणि रविवारी कामकाज सुरू असल्यामुळे आज (ता. 13) मोठ्या प्रमाणावर बॅंका व पोस्ट कार्यालयांबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, आयडीबीआय आणि बॅंक ऑफ बडोदासारख्या अनेक बॅंकांनी नागरिकांसाठी खास पिण्याच्या पाण्याची, चहा, बिस्किटे तसेच बसण्याची व्यवस्था केल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण नाहीसे झाले. 

नागरिक सकारात्मक विचार करून बॅंक कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचेही दिसले. लक्ष्मी रस्त्यावरील आयडीबीआय बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची विशेष काळजी घेतली. रांगेत थांबलेल्या ग्राहकांची आपुलकीने विचारपूस करत बॅंकेने त्यांना चहा, पाणी, बिस्किट उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. 

सदाशिव पेठेतील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना खास बोलावून घेण्यात आले होते. नोटा संपल्यामुळे रांगेत थांबलेले नागरिक निराश होत असल्याचे दिसून आले. अशा नागरिकांची समजूत काढण्याचे काम सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी केले. बॅंकिग क्षेत्रातील कामाच्या अनुभवाचा फायदा घेत नागरिकांना प्रक्रियेतील अडचणी समजावून सांगण्यात आल्यामुळे रांगेत थांबलेले नागरिकसुद्धा समाधान व्यक्त करत होते. 

जीपीओ, सिटी पोस्ट यांसह शहरातील लहान मोठ्या टपाल कार्यालयांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी दुपारनंतर नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रविवारी शहरातील विविध भागांतील कार्यालयांमध्ये नागरिकांना नोटा बदलून मिळण्यास मदत झाली. 

पीपल्स बॅंक आज सुरू राहणार 

गुरू नानक जयंतीनिमित्त आज सर्व बॅंकांना सुटी आहे. परंतु, पुणे पीपल्स बॅंकेच्या सर्व शाखा सोमवारी (ता. 14) दैनंदिन कामकाजाच्या वेळेनुसार सुरू राहणार आहेत, अशी माहिती बॅंकेचे सरव्यवस्थापक सदानंद दीक्षित यांनी दिली आहे. 

एटीएम सेवा अंशतः सुरू 

नागरिकांकडून शंभरच्या नोटांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र रिझर्व्ह बॅंकेकडून या नोटांचा पुरवठा वाढविण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक बॅंकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा पडून आणि शंभरच्या नोटा संपल्या आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील एटीएम सेवांवर झाला आहे. गेली दोन-तीन दिवस एटीएम केंद्र पूर्णतः बंद किंवा "आउट ऑफ कॅश' राहण्यामागे हे मोठे कारण असल्याचे बॅंकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री काही खासगी बॅंकांनी एटीएम केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. रात्री विविध भागांतील एटीएम केंद्रांवर छोट्या रांगा लागल्याचे दिसून आले. रविवारी सायंकाळपर्यंत एटीएम केंद्रांमधून पैसे काढण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. 

गुरु नानक जयंतीनिमित्त सोमवारी बॅंकांना पुन्हा एक दिवसाची सुटी आल्यामुळे सोमवारी एटीएमवर नागरिक गर्दी करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रविवारी उशिरा एटीएम केंद्रांवर नोटांची भरणा करण्यावर बॅंकांनी भर दिला आहे. मात्र, ही भरणा केलेली रक्कम सोमवारी दिवसभर पुरणार नाही, असा अंदाज बॅंकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शहरातील एटीएम सेवा पूर्ववत होण्यासाठी मंगळवार किंवा बुधवार उजडावा लागणार आहे. 

Web Title: Money along with tea, biscuits