राज्यभरात सर्वत्र पावसाची दमदार हजेरी; मॉन्सून पुन्हा सक्रीय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कोकण, गोव्यात मात्र पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. मुंबईत पावसाचा जोर कायम आहे.

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या काही सरींनी आज (शुक्रवार) दुपारी शहराच्या वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. पावसाच्या मध्यम ते हलक्‍या सरी पडल्याने पुन्हा मॉन्सून सक्रीय होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. शहरात पुढील चोविस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होते. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. या पार्श्‍वभूमीवर सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यामुळे उन्हाच्या चटक्‍यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता. अशातच, दुपारी तीन वजता पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पाषाण, सिंहगड रोड, पुणे विद्यापीठ परिसर, बाणेर, बालेवाडी, सातारा रस्ता, कोथरुड, नगर रस्ता या सर्व ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. 

कोकण, गोव्यात मात्र पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. लोणावळा, खंडाळा, गगनबावडा, कोयना, राधानगरी, अंबोली अशा घाटमाथ्यावर मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असली तरीही राधानगरी, कोयना, गगनबावडा, आंबोली येथे पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पुण्याच्या जवळील पानशेत, वरसगाव, वेल्हा, मावळ, भोर, जुन्नर या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याच्या इशाऱ्यात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon reactivated A strong presence of rain all over the state