महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत वरुणराजा बरसणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

पुणे : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे. 

पुणे : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे. 

यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने बहुतांश भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. या बाबत "सकाळ'शी बोलताना वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै म्हणाले, "हिंदी महासागरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे येत्या शनिवार (ता. 18) आणि रविवारपर्यंत (ता. 19) अंदमान आणि निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील भागात मॉन्सून स्थिरावेल. मॉन्सून 23 मेपर्यंत संपूर्ण अंदमान आणि निकोबारचा परिसर व्यापेल.

सामान्यतः 20 मेपर्यंत मॉन्सून संपूर्ण अंदमान व्यापतो. यंदा मात्र त्यासाठी दोन ते तीन दिवस उशीर होणार आहे. त्यानंतर केरळपर्यंतचा प्रवास मॉन्सून सहा जूनपर्यंत पूर्ण करेल. सर्वसाधारणपणे एक जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र तो पाच दिवस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात 5 ते 10 मेच्या दरम्यान मॉन्सून दाखल होतो. तळकोकणात त्याच्या पहिल्या सरी पडतात. या वर्षी केरळातच उशिरा दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही तो सर्वसाधारण तारखेच्या उशिरा दाखल होणार आहे.'' 

भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात दिलेल्या तारखांच्या चार दिवस पुढे-मागे मॉन्सून दाखल होऊ शकतो, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
मॉन्सून देशाच्या दक्षिण भागात उशिरा दाखल होत असला तरीही त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास तो लवकर पूर्ण करेल, असे पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

"एल निनो'चा प्रभाव नाही 
प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहाचा (एल निनो) परिणाम मॉन्सूनच्या प्रगती होत असल्याचा दावा काही हवामान तज्ज्ञ करतात. त्यामुळे याचीही नोंद मॉन्सूनच्या प्रगतीसाठी केली जाते. सद्यःस्थितीत "एल निनो' सक्रिय नाही. त्यामुळे मॉन्सूनच्या सुरवातीला "एल निनो'चा प्रभाव राहणार नाही, असेही डॉ. पै यांनी स्पष्ट केले. 
मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखा 
वर्ष ............. आगमनाची सर्वसाधारण तारीख ............. प्रत्यक्ष आगमन 
2014 .......... 5 जून ........................................ 6 जून 
2015 .......... 30 मे ........................................ 5 जून 
2016 .......... 7 जून ........................................ 8 जून 
2017 .......... 30 मे ........................................ 30 मे 
2018 .......... 29 मे ........................................ 29 मे 

''अंदमान आणि निकोबार बेटातील मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये अंदमानच्या बेटांवर मॉन्सून स्थिरावेल. त्यानंतर केरळच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होईल. सर्वसाधारण तारखांच्या तुलनेत यंदा पाच दिवस उशीरा केरळमध्ये दाखल होण्याची शक्‍यता आहे.''
- डॉ. डी. एस. पै, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे 
 
 

Web Title: Monsoon will enter in Maharashtra till June 11