#MonsoonTourism जीव होतो ओलाचिंब

संजय अमृतकर 
रविवार, 22 जुलै 2018

पाऊस आणि ट्रेकर यांचं नातं जगातल्या कोणत्याही नात्यांपेक्षा अधिक तरल आणि जिव्हाळ्याच्या घट्ट विणीनं गुंफलेलं. त्यात पावसाळ्यातला सह्याद्री तर घनगर्भ नवलाईनं नटलेला. त्याचं रूपडं एखाद्या बाळसेदार बाळासारखं निरागस भासणारं, त्यामुळे अन्य कोणत्याही मोसमांतल्या ट्रेकिंगपेक्षा पावसाळ्यातल्या सह्याद्रीच्या ट्रेक्‍ससाठी सर्व स्तरांतल्या ट्रेकर्संना जास्त उत्साह असतो. त्यामुळे "येक तरी ओवी अनुभवावी' या धर्तीवर "येक तरी ट्रेक अनुभवावा पावसाळी सह्याद्रीचा' असे उत्फूर्तपणे म्हणावेसे वाटते. 

जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि निथळत्या सह्याद्रीच्या लाल-करड्या तुपाळ मातीत भटक्‍यांच्या पावलांचे पहिल्या ठशांचा माग पावसाळ्यातच लागायला सुरवात होते.

रणरणत्या उन्हातला सह्याद्री मी मी म्हणणाऱ्या ट्रेकरचा घाम काढतो. त्यामुळे उन्हाळ्यातल्या कोपिष्ट सह्याद्रीशी लडिवाळपणा करण्याच्या फंदात कोणी पडत नाही. डिहाड्रेशननं अंगाची लाहीलाही ठरलेली, तर कडाडत्या हिवाळ्यात हाडं गोठवणाऱ्या थंडगार काळ्या कातळांत अंगोपांगांचं गोठणं ठरलेलं... त्यामुळे कडाक्‍याच्या थंडीत महाहिमपुरुष बनलेल्या सह्याद्रीच्या नादाला लागण्यास कोणी धजावत नाही...त्यामुळे या दोन ऋतूंतला निसर्गवेडाचं साचलेली हौस पावसाच्या खळाळत्या पाण्यात ट्रेकर्स भागवतात. आता पावसाळी ट्रेकिंगवर बोलायच म्हटलं, तर हल्ली सह्याद्रीच्या मातीत जिकडे तिकडे जत्रेचं रूप आलंय.Image may contain: one or more people, people standing, grass, sky, outdoor, nature and water

प्रत्येक शनिवार-रविवार जणू सह्याद्रीच्या दारी लगीनघाईचा मांडवच पडतो. हवशे, नवशे, गवशे त्यांच्या निसर्ग भ्रमणाची आटोपशीर हौस काठाकाठानं एन्जॉय करीत सह्याद्रीतील सोप्या-सहज, तट बुरूजांवर धडपडताना, गळ्यात कॅमेरा अडकवून लुडबुडताना दिसतात. परंतु ट्रेकिंगचं निमित्त असो, निसर्गप्रेम असो वा फोटोग्राफीनिमित्त... सह्यप्रेमींची एक प्रामाणिक जमात भरभक्कमपणाने महाराष्ट्रात उभी राहत आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या सौंदर्याप्रती आणि त्याच्या संवर्धनाप्रती जागरुकता वाढत आहे, हे त्यातलं मोठं समाधान. पण हल्ली कुठेना कुठ ट्रेकर्सच्या जीवावरल्या अपघाताच्या बातम्या मन विषण्ण करतात. नकारात्मक चर्चेला उधाण येतं. हवश्‍या नवश्‍यांमुळे हाडाचे ट्रेकर नाहक बदनाम होतात, सरकार दरबारी दखल घेतली जाते. इतर आवश्‍यक सुधारणा आणि शिस्तबद्धता आणण्याऐवजी बंदीचं हत्यार उपसलं जातं. त्यानं जातिवंत ट्रेकर हतबल होतो.

सुरक्षित ट्रेकिंगसाठी पावसाळ्यात सह्याद्रीचा कोणता प्रदेश सुरक्षित, हेच आधी सांगणं क्रमप्राप्त ठरतं. तसं अलीकडील काळात "सुरक्षित ट्रेकिंग'बाबत बरीचशी जागरूकता दिसते. त्यामुळे ते पावसाळ्यासारख्या जोखमीच्या मोसमातील ट्रेक करताना पुरेसा गृहपाठ करूनच निघताना दिसतात. पण हे प्रमाण तसं बरंच कमी आहे. 

उत्तर महाराष्ट्रातला सर्वोच्च गड साल्हेर ते कोल्हापूर-गोवा सीमेजवळचा पारगड एवढ्या अफाट मुलुखात अनवट ट्रेक्‍सना पर्वणी अनुभवता येते. सह्याद्रीच्या या रांगेत कुटुंबकबिल्यासह फिरस्तीसाठी एकापेक्षा एक सरस डोंगरमाथे स्वागताला उत्सुक आहेत. त्यातील पावसाळी ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम अशा काहींच्या वाटांचा मागोवा घेऊयात. 

किल्ले साल्हेर 
शुभारंभाचा येळकोट करू तो महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शानदार किल्ले साल्हेरपासून. या किल्ल्याला शिवकाळात साक्षात शिवस्पर्श झाला नी आपसूकच त्याला सोनेरी वर्ख चढला. तसा साल्हेर आहेच उतुंग आणि राजबिंडाही. पावसाळ्यात त्याचं सौंदर्य निव्वळ दृष्ट लागण्यासारखंच. पावसाळ्याच्या उत्तरार्धात गेलात की तुम्ही त्याच्या देखण्या रूपाच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. रानफुलांचं नजरेपार कोंदण डोळ्यांचं पारणं फेडतं. साल्हेरवर चढाईसाठी तसे दोन राजमार्ग. एक चक्क साल्हेर गावांतून, तर दुसरा मुल्हेर-साल्हेर मार्गावरील वाघांबे गावांतनं. दोनही बाजूंनी 2-3 तासांत आपण साल्हेरमाथा सहज गाठू शकतो. मुक्कामासाठी स्वच्छ गुहा आहेत. पिण्याचे बारमाही पाणीही. पावसाळ्यात अतिशय सुरक्षित असा साल्हेर ट्रेक अवश्‍य करावा तेही दिल खोल के. 

साल्हेरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी तालुक्‍याच गांव सटाणा (जि. नाशिक) येथून थेट बस आहेत. सटाणा येथे येण्यासाठी पुणे, मुंबई वा नाशिक येथून बससेवा आहे. नाशिक साल्हेर अंतर साधारण 125 किलोमीटर आहे. पायथ्याचं गांव साल्हेर येथे जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. किल्यावर मुक्कामयोग्य गुहा आणि पिण्यायोग्य पाणी आहे. 

धुक्‍याच्या चादरीतला "त्रिंगलवाडी' 
दुसरा अग्रगण्य पावसाळी ट्रेक म्हणजे इगतपुरी तालुक्‍यातील त्रिंगलवाडी किल्ला. हा सारा परिसर म्हणजे धुंद करणार मोहमयी धुकंजाल जणू. सतत धुंद करणारं धुक्‍याचं साम्राज्य, कधी धुवाधार, तर कधी हळूवार नटरंगी पाऊस, सोबतीला हिरव्या सौंदर्याने सजलेला सह्याद्री. या काळात इथल्या कुठल्याही डोंगरावर जा, धुक्‍यात हरवल्याशिवाय आणि चिंब भिजल्याशिवाय तुमचा ट्रेक सफल होणारंच नाही. 

भंडारदऱ्याचा पाबरगड 
पावसाळ्यातलं ट्रेकिंगचा तिसरा जिव्हाळा ठरतो तो भंडारदरा परिसरातील तमाम ट्रेकर्सची पंढरी अर्थात पाबरगड. खरं तर आमची ट्रेकर जमात या अप्रतिम किल्ल्यावर सतत अन्याय करत आली आहे. या परिसरात कळसूबाई, रतनगडावर ते गर्दी करतील; पण जवळच्या पाबरच्या वाटेला कुणी फारसं फिरकत नाही. पण हा ट्रेक या दिवसांत आवर्जून करण्यायोग्य आहे. राजूर-भंडारदरा रस्त्यावर गुहिरे हे पायथ्याचं गांव. अर्ध्या दिवसाचा मजबूत ट्रेक केल्यानंतर तुम्ही जवळील प्रसिद्ध असा रंधा धबधबाही पाहू शकता. धरणाजवळील "अंब्रेला फॉंल' सुरू असेल तर सोने पे सुहागा. दिवस सत्कारणी लागल्याचं चिंब समाधान मोठं सुख देतं. 

नाशिकहून भंडारदरा साधारण 64 किलोमीटरवर आहे. पुण्याहून संगमनेर-अकोला-राजूर-भंडारदरा असा गाडीमार्ग आहे. तर मुंबईहून इगतपुरी-घोटी-भंडारदरा असा गाडीमार्ग आहे. पायथ्याचं गुहिरे गांव येथे मुक्काम करण्यायोग्य मंदिर आहे. गडावर मात्र मुक्कामयोग्य जागा नाही आणि पाणीही नाही. 

चौथी सलामी भीमाशंकर रेंजला 
चौथा जयजयकार करूया भीमाशंकर रेंजला. पावसाळ्यात या भागातील भटकंतीची नशाही कुछ औरच. भीमाशंकर माथ्यावर येण्या-जाण्यासाठी म्हणून जेवढ्या सर्वोत्कृष्ट नितांतसुंदर वाटा आहेत ना, तेवढ्या उभ्या महाराष्ट्रात कुठल्याही माथ्यावर जाण्यासाठी नसतील. इथला सारा पावसाळा आमच्या ट्रेकर जमातीचा वीक पॉइंट. पावसाळ्यात कुठल्याही बाजूने वा वाटेने भीमाशंकर ट्रेक केला नाही, असा ट्रेकर शोधून सापडणार नाही. वाजंत्री घाट, गणपती घाट, शिडीची वाट, बैलघाट, शिळघाट अशा धमाल घाटवाटांनी भीमाशंकरची चढाई-उतराई म्हणजे नबाबी रूबाब जणू. पश्‍चिम बाजूचं खांडसची वेस ज्यानं ओलांडली नाही, त्यानं स्वतःला ट्रेकर म्हणवून घेऊ नये. भीमाशंकरच्या पश्‍चिमेला घाटवाटां जणू पेव फुटलं आहे. कुठल्याही वाटेने चढला-उतरलात तरी 4-5 तास सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवतो. भीमाशंकर ट्रेकसाठी पुणे-मुंबई-नाशिक येथून खांडसपर्यंत सारखेचं अंतर असावे. ते 140-150 किलोमीटर अंदाजे. खांडस येथे मुक्काम व जेवण व्यवस्था आहे. तसेच भीमाशंकर येथेही सुविधा करता येते. 

महाबळेश्‍वर रेंजमधला ढवळे घाट 
पावसाळ्यातला पाचवा धमाल ट्रेक म्हणजे महाबळेश्‍वर रेंजमधला ढवळे घाट. जोर गांव मुक्काम, मग श्री क्षेत्र महाबळेश्वर. खऱ्या अर्थाने अंगात रग असेल ना तर ऐन पावसाळ्यात हा ट्रेक करावा. 33 कोटी देव, सगळे साधूसंत आणि माता-पिता अश्‍या सर्वांची जीवापाड आठवण आणणारा हा असा कसदार, कमाल ट्रेक. कोकणातलं ढवळेगांव पायथ्याला वसलेलं. थेट गाडीरस्ता आहे. अर्थात बसदेखील जाते. ढवळे गावातनं वाटाड्या घेऊन सुटायचं. सकाळी 9 वाजता ट्रेक सुरू केला तरी जोर गावांत पोहचायला सायंकाळ होणार. बहिरीची घुमटी हा या ट्रेकचा सुवर्णमध्य. पाण्याचं खळाळणं काय असतं, हे इथं समजतं. चढाईची रग इथल्या दऱ्या-खोऱ्यांत जिरते. इथंच जावळीचा राजा चंद्रराव मोरे आठवतो आणि त्याची रग जिरवणारे राजा शिवप्रभूही! मुक्कामानंतर सकाळी गणपती घाटाने श्री क्षेत्र दर्शन घ्यायचं, नी सांजच्याला घरी परतायचं, पण या पावसाळी ट्रेकसाठी इतर भिडूही तयारीचे हवेत. 
ढवळे घाट ट्रेकसाठी पोलादपूर येथून बस आणि खासगी गाड्या उपलब्ध आहेत. ढवळे गावात मुक्कामासाठी शाळा/मंदिर आहे. गावांत जेवणाची व्यवस्था होऊ शकते. जोर गावातही मुक्काम, जेवण व्यवस्था होऊ शकते. 

समर्थांची शिवथर घळ 
ट्रेकचं सहावे निशाण सर करायचे ते शिवथर घळ परिसरात. मढेघाट, गोप्याघाट, आंबेनळीची वाट, उपांड्या घाट, सुपेनाळ अशा चित्रविचित्र नावांच्या घाट आणि वाट-वेशींनी शिवथरघळीचे साम्राज्य मढलेले आहे. पावसाळ्यात या वाटांची चढण-उतरण म्हणजे सर्वांगसुंदर अनुभव. केळद हे घाटमाथ्यावरचं अप्रतिम गाव. त्याच्या आसपास या वाटांची उतरण सुरू होते ती शिवथरघळीकडे. कुठल्याही एका घाटवाटेने उतरायचं. शिवथरघळीत रामदास स्वामी आश्रमात मुक्काम करायचे. मग दुसऱ्या दिवशी कुठल्याही एका केळदकडे चढाई करायची. निसर्गाचं इतकं विविधरंगी रूपडं फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळतं, एवढं मात्र नक्की. 
शिवथरघळीत ट्रेक करत जायचं असेल तर केळद हे माथ्यावरचं सोयीचं गाव. केळदपर्यंत जाण्यासाठी पुण्याहून वेल्हे गावातून भन्नाट घाट रस्ता आहे. बससेवा आणि खासगी गाड्या उपलब्ध आहेत. केळद येथे मुक्काम, जेवणाची व्यवस्था आहे. तशी शिवथरघळीतही सोय आहे. 

लेण्यांनी समृद्ध पाटणादेवी-कण्हेरगड परिसर 
सातव्या ट्रेकचा शेवट करूया पाटणादेवी-कण्हेर गडाने. खानदेश आणि मराठवाडा यांच्या परिसरात चाळीसगावजवळच्या ट्रेकसाठी हा सर्वोत्तम पर्याय. चाळीसगावपासून 18 किलोमीटरवर पाटणादेवी तसं प्रसिद्ध धार्मिक ठिकाण. पूर्ण जंगलाने वेढलेलं. काळ्या पाषाणात घडवलेल्या दोन मंदिरांची कलाकुसर नजरेची पारणं फेडते. एक पाटणादेवीचं मंदिर, तर दुसरं शिवशंकराचं. कण्हेरगडाचा अप्रतिम असा धमाल ट्रेक पावसाळी भटकंती सार्थ ठरवतो. याच परिसरात हाकेच्या अंतरावर पितळखोरेच्या लेण्या बघणं, कलेचा जणू जागरच आहे. पाटणादेवी मंदिरापासून पितळखोरे लेण्यापर्यंत पोचायलाही तासाभराचा ट्रेक आहे. तेथील डोंगराळ प्रदेशावरील वनश्री प्रेक्षणीय आहे. खानदेशातल्या अतिप्राचिन वसाहतीमध्ये याही वसाहतीचा समावेश आहे. जगाला शुन्याची देणगी देणारे प्रसिद्ध गणितीतज्ज्ञ भास्कराचार्यांची ही जन्म आणि कर्मभूमी. त्यांच्या चांगदेव या नातवाने शके 1206 मध्ये एक विद्यालय स्थापले, तेथे आजोबांच्या गणित आणि ज्योतिष विषयावरील अध्ययनाची सोय केली होती. या परिसरात पुरातन लेण्यांचाही शोध लागला आहे. येथील कोरीव काम आणि चित्रकला वेरुळ अजिंठ्याच्या धर्तीवर करण्यात आले आहे. मराठी-अहिराणीतील संयुक्त शिलालेखही येथेच आढळला आहे. जवळचा कण्हेरगडाचा अप्रतिम ट्रेक पावसाळी भटकंती सार्थ ठरवतो. 

पाटणादेवी मंदिरापासून पितळखोरे लेण्यांपर्यंत पोचायलाही तासाभराचा ट्रेक आहे. पदरात धारकुंडचा अप्रतिम धबधबाही. अशा अनेक कसदार भटकंतीने सह्याद्रीचा पावसाळी नजराणा खुलत जाणारा आहे. ट्रेक करताना जाणिवपूर्वक अधिक सजगता राखली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला देणगी मिळालेल्या सह्याद्रीसारख्या बावनकशी सोन्याच्या लकाकीला अधिक चकाकत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्यालाच करायचे आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. येथे जाण्यासाठी चाळीसगाव हे मुख्य गाव. चाळीसगाव येथे जाण्यासाठी पुणे-मुंबई-नाशिकहून रेल्वेसेवा आहेच. चाळीसगाव येथून पाटणादेवी येथे जाण्यासाठी बस आणि खासगी गाड्या उपलब्ध. पाटणादेवी येथे वनखात्याने राहाणे आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. 

Web Title: #MonsoonTourism treking story