बारामतीत उभारतायेत या श्रेष्ठ कवीचे भव्य स्मारक

मिलिंद संगई
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या व शहराच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा जपणाऱ्या कविवर्य मोरोपंत स्मारकाचे काम आता पुन्हा एकदा वेगाने सुरू होणार आहे. 
 

बारामती शहर (पुणे) : बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या व शहराच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा जपणाऱ्या कविवर्य मोरोपंत स्मारकाचे काम आता पुन्हा एकदा वेगाने सुरू होणार आहे. 

याबाबत ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी माहिती दिली की, कविवर्य मोरोपंतांची बारामती, असा नावलौकिक आहे. श्रीमंत बाबूजी नाईक हे पेशव्यांचे सावकार होते. त्यांच्याकडे असलेल्या नवरत्नांमध्ये कविवर्य मोरोपंत हे होते. त्यांच्याकडे अफाट शब्दभांडार होते. त्यांचे साहित्य व त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने बारामतीत कविवर्य मोरोपंत स्मारकाची उभारणी करण्याचा निर्णय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला. 

मोरोपंतांनी ज्या ठिकाणी वास्तव्य करून "आर्या' लिहिल्या, त्याच ठिकाणी अत्यंत भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी मोरोपंतांचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन करण्यात येणार आहे. तसेच, त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यांचा जीवनपटही चितारण्यात येणार आहे. अत्यंत सुंदर व देखणी, अशी ही इमारत आहे. स्मारक उभारणीसाठी तीन कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, गेली सव्वा वर्षे हे काम रखडले होते. ते आता पुन्हा वेगाने सुरू होणार आहे. मोरोपंतांचा ब्रॉंझचा पुतळा व येथे बसविण्यात येणारी म्युरल्स आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. 

मोरोपंतांवर उपलब्ध असलेल्या साहित्याचे येथे परिपूर्ण संकलन व्हायला हवे. नव्या पिढीला अभ्यासासाठी मोरोपंतांचे समग्र साहित्य येथे असावे. मोरोपंत स्मारक हे बारामतीच्या वैभवशाली इतिसाहाची साक्ष देणारे ठरेल. 
- माधव जोशी, अध्यक्ष, 
कविवर्य मोरोपंत स्मारक समिती, बारामती 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The monument of poet Moropant in Baramati city will be completed soon