देवाच्या आळंदीत मोर्चांची वारी (व्हिडिओ)

alandi
alandi

नागरी सुविधांच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी नागरिक आक्रमक 

आळंदी : येथील नगरपालिकेवर नागरी सुविधांच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला. प्रभाग एकमधील पद्मावती मंदिराकडे रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिक शंभरहून अधिक रहिवाशांच्या जमावाने थेट नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांना घेराव घालत दीड तास घोषणाबाजी केली. अखेर पोलिस आल्यावर आंदोलनकर्ते शांत झाले. "आचारसंहिता झाल्यानंतर रस्त्याच्या कामास सुरवात केली जाईल,' या मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनावर आंदोलक घरी परतले. 

आळंदीच्या प्रभाग चारमधील नागरिकांनी सोमवारी पाण्यासाठी; तर प्रभाग दोनचे नगरसेवक तुषार घुंडरे यांनी मंगळवारपासून (ता. 17) रस्त्यासाठी आंदोलन सुरू केले. आज प्रभाग एकमधील नागरिकांनी पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी अर्चना घुंडरे, सविता मोहिते आणि निस्सार सय्यद यांच्या नेतृत्वाखाली थेट पालिकेत येऊन घोषणाबाजी केली.

या वेळी पालिकेतील नगराध्यक्ष उमरगेकर यांच्या दालनात जात नागरिकांनी अकार्यक्षमतेबाबत जाब विचारला. या वेळी मुख्याधिकारी भूमकर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सुनीता रंधवे, स्मिता रायकर, अशोक कांबळे आदी उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी तब्बल दीड तास घोषणाबाजी केली.

या वेळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आले आणि आंदोलनकर्त्यांना शांत केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मागणीचे निवेदन दिले; तर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्यावर जमावाने घरचा रस्ता धरला. 

आंदोलन प्रतिष्ठा वाढविण्यासाठी : नगराध्यक्षा 
याबाबत नगराध्यक्षा उमरगेकर यांनी सांगितले की, स्थानिक रहिवाशांपेक्षा काही संस्थाचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मोर्चा आणला होता. वास्तविक हा रस्ता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट केला असून, साडेसहा कोटींची तरतूद केली असून, आणखी दीड कोटी रुपये लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत रस्ता विकसित करण्याबाबत चर्चा झाली आहे. हा रस्ता पंधरा मीटर रुंद प्रस्तावित असून, अस्तित्वात नऊ मीटर रुंद आहे. त्यामुळे उर्वरित अतिक्रमण आणि भूसंपादन करण्याची कार्यवाही बाकी असल्याने काम रेंगाळले आहे. वास्तविक, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याऐवजी थेट दालनात घुसून केलेली घोषणाबाजी निषेधार्ह आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आंदोलन केले. तरीही पद्मावती रस्त्यावरील स्वच्छतेसाठी तातडीने आरोग्य विभागाला आदेश दिले आहेत. 

.........हा रस्ता पूर्वी कमी लांबीचा होता. आता थेट पद्मावती मंदिरापर्यंत रस्ता केला जाणार आहे. आता दोन दिवसांत आचारसंहिता सुरू होईल. रस्त्यासाठीचा निधीही कमी आहे. आचारसंहिता संपली की रस्त्यास सुरवात केली जाईल. कोणत्या रस्त्यासाठी किती निधी, याबाबत नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा केली जाते. सध्या निधी कमी आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार विकासाची कामे केली जात आहेत. 
- समीर भूमकर, 
मुख्याधिकारी, आळंदी (ता. खेड) नगरपालिका 
आळंदी नगरपालिकेवर नागरी सुविधांच्या मागणीसाठी मोर्चा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com