पोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके 

संदीप घिसे 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिले आहेत. एका पथकात किमान आठ जण असणार आहेत. मनुष्यबळानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक तयार केले आहे.

पिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिले आहेत. एका पथकात किमान आठ जण असणार आहेत. मनुष्यबळानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक तयार केले आहे.

हिंजवडी, वाकड, सांगवी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, एमआयडीसी-भोसरी, दिघी, आळंदी, चाकण, तळेगाव, एमआयडीसी-तळेगाव आणि देहूरोड ही १४ पोलिस ठाणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या कक्षेत येतात, तर प्रस्तावित चिखली पोलिस ठाणे अद्याप कार्यान्वित झाले नाही. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय कार्यान्वित होण्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असताना चाकण येथे मराठा मोर्चा आंदोलनास हिंसक वळण लागून सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. भविष्यात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडू नयेत, याची काळजी पोलिस आयुक्‍त घेताना दिसत आहेत.

सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचे मुख्यालय कार्यान्वित झाले नाही. यामुळे अचानक हिंसक घटना घडल्यास पुणे पोलिसांकडून जादा कुमक मागवावी लागणार आहे. ती कुमक येण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांचा वापर करून अतिरिक्‍त कुमक तयार करण्यासाठी पोलिस ठाण्यानिहाय हे पथक तयार केले आहे. प्रत्येक पथकात आठ जण असणार आहेत. पोलिस हवालदार पथकाचे प्रमुख असणार आहेत. कोणत्या पोलिस ठाण्यांमध्ये किती पथक तयार केले आणि त्यात कोण-कोण आहेत याची यादी पोलिस आयुक्‍तालयात पाठविली आहे. एखाद्या ठिकाणी घटना घडल्यास पोलिस आयुक्‍त, अतिरिक्‍त आयुक्‍त, उपायुक्‍त किंवा सहायक आयुक्‍त या पथकाला बोलाविणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून पोलिस ठाण्यांमध्ये याबाबत सूचना आल्यावर स्वतःच्या वाहनाने कमीत कमी वेळेत सांगितलेल्या ठिकाणी पोचण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत.

पोलिस ठाण्यातील दोन पथकांसाठी एक अधिकारी नियुक्‍त केला. पूर्वी एखादी घटना घडल्यास तेथे जादा कुमक पाठवायची झाल्यास कोणाला पाठवायचे याबाबत निर्णय घेताना अडचणी येत होत्या. आता ज्या पथकाला आदेश आला त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचायचे आहे. पथक प्रमुखाने आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहे. यामुळे कमी वेळेत जादा मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते.
- सतीश पाटील,  सहायक आयुक्‍त, गुन्हे शाखा
 

पोलिस आयुक्‍तांकडून चाचणी
पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी चार दिवसांपूर्वी या पथकाची अचानक चाचणी घेतली. त्यांनी ग्रामीण भागातील तळेगाव आणि शहरी भागातील चिंचवड पोलिस ठाण्यातील पथकाला पोलिस आयुक्‍तालयात बोलविले. कोणते पथक किती वेळेत पोचली, याची नोंद त्यांनी घेतली.

Web Title: More action teams in police stations