महावितरणकडून आणखी "शॉक' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे. 

पुणे - नवीन वीजजोडसाठी अर्ज केल्यानंतर ग्राहकाला जे फर्म कोटेशन (पैसे भरण्यासाठीचे चलन) दिले जाते, त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा समावेशदेखील असतो. पूर्वी घरगुती नवीन वीजजोडसाठी पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. तर, व्यावसायिक वापरासाठी प्रति किलोवॉट एक हजार रुपये आकारले जात होते. त्यामध्ये आता महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी घरगुती वीजजोड असेल, तर पाचशे रुपये प्रति किलोवॉट सुरक्षा ठेव आकारली जात होती. त्यामध्ये वाढ करून ती आता 940 रुपये करण्यात आली आहे. तर, व्यावसायिक वीजजोडसाठी प्रति किलोवॉट 1000 हजार रुपये सुरक्षा ठेव आकारली जात होती, ती आता थेट 2600 ते 2700 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्पन्नात घट होत असल्याचा दावा करीत महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. या प्रस्तावात प्रति युनिट विजेच्या दरात वाढ प्रस्तावित करतानाच सौरऊर्जेसाठी प्रथमच नवीन दर आणि उद्योगांसाठी हार्मोनिक्‍स दंड लावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योगापर्यंत सर्वांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाच आता महावितरणच्या मुख्य अभियंता वितरण विभागाने नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या रकमेत परस्पर वाढ केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले नाही. अचानक ही वाढ केल्याने नव्याने वाद सुरू झाला आहे. या वादात गेल्या काही दिवसांपासून नवीन वीजजोड देण्याचे प्रस्ताव रखडले असल्याचे समोर आले आहे. 

नवीन वीजजोड देण्यासाठी महावितरणकडून ग्राहकाला फर्म कोटेशन दिले जाते. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकाराचे किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती (चलन) असते. त्यापैकी सुरक्षा ठेव हा एक प्रकार आहे. 

यासंदर्भात महावितरणचे एका अधिकारी नाव न देण्याच्या अटीवर म्हणाले, ""वितरण विभागाने ही वाढ लागू केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यासंदर्भातील विरोधदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला आहे. सुरक्षा ठेवीवर ग्राहकाला 9.65 टक्के दराने महावितरण व्याज देते. महावितरण आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सुरक्षा ठेवीची रक्कम वाढविली, तर त्यावरील व्याजाची रक्कमदेखील वाढणार आहे. ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ करू नये, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.'' 

अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ... 
महावितरणने सुरक्षा ठेवीच्या रकमेत वाढ केली आहे. वास्तविक, ही सर्व विभागात (झोनमध्ये) एकसारखी असली पाहिजे. परंतु, प्रत्येक विभागात मात्र ती वेगवेगळी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रास्ता पेठ येथील एक किलोवॉट वीजजोडसाठी 2600 रुपये, तर कोथरूड विभागात 2700 रुपये आकारली जात आहे. यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांतदेखील गोंधळ असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नवीन वीजजोड देण्याचे काम थांबले आहे. एमईआरसीच्या नियमानुसार नवीन वीजजोड घेण्याच्या कोटेशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ती नियमानुसारच आहे, असे महावितरणच्या वितरण विभागाकडून सांगण्यात आले. 

नवीन वीजजोडसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी महावितरणकडून देण्यात आलेल्या कोटेशनमध्ये खूपच जास्त सुरक्षा ठेव आकारण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता महावितरणकडून ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीजजोडाचा खर्च वाढला आहे. 
रूपाली तांबे, ग्राहक, कर्वेनगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than double the increase in security deposit for new electricity connection