मोरगाव ग्रामपंचायतीने दिली चक्क खोटी माहिती!

संगीता भापकर ः सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

जेजुरी-मोरगाव मुख्य रस्त्यावर सात वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेले बाजारओटे वापराअभावी धूळखात पडून आहेत. मात्र, ते बाजारओटे वापरात असल्याचे पत्र मोरगाव ग्रामपंचायतीने बारामती पंचायत समितीला दिले आहे. बाजारओटे वापरात नसताना ते वापरत असल्याची खोटी माहिती देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

धूळखात पडलेले बाजारओटे वापरात असल्याचे प्रशासनाला सांगितले; माजी सरपंचांचा आरोप

मोरगाव (पुणे) ः जेजुरी-मोरगाव मुख्य रस्त्यावर सात वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेले बाजारओटे वापराअभावी धूळखात पडून आहेत. मात्र, ते बाजारओटे वापरात असल्याचे पत्र मोरगाव ग्रामपंचायतीने बारामती पंचायत समितीला दिले आहे. बाजारओटे वापरात नसताना ते वापरत असल्याची खोटी माहिती देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

काही वर्षांपूर्वी मोरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी खोटे रेकॉर्ड सादर करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गट नंबर 1194 मधील 3 हेक्‍टर 84 आर क्षेत्रात बाजारओटे व पशुवैद्यकीय केंद्र उभारले आहे. गावात सरकारी योजनेतून कामे करताना ती जागा ग्रामपंचायतीच्या नावे असणे बंधनकारक आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची खात्री न करता संबंधित कामांना मंजुरी दिली. दोन्ही कामे पूर्ण होऊन सात ते आठ वर्षे झाली आहेत; पण येथील बाजारओटे अद्याप वापरात येऊ शकलेले नाहीत.पशुवैद्यकीय इमारतीचा वापर अनधिकृतपणे सुरू आहे.

मोरगाव ग्रामपंचायतीने 27 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या मासिक सभेत बाजार हस्तांतराचा ठराव केला आहे. तसेच, त्या जागेत नियमबाह्य खर्च करून काट्या काढणे व सपाटीकरणाची कामे केली आहेत. मूलभूत सुविधा योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बाजारओटे बांधले आहेत. मात्र, ती जागा ग्रामपंचायतीची नसताना त्यावर ओटे बांधल्याने ते गेल्या सात वर्षांपासून वापरात नसल्याची परिस्थिती आहे. या संदर्भात बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ग्रामपंचायतीला पत्राद्वारे विचारणा केली. त्यानुसार सरपंच नीलेश केदारी व ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर गाडे यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी बाजारओट्यांचा वापर सुरू केल्याचे खोटे पत्र बारामती पंचायत समितीला दिले. बाजारओट्यांचा वापर होत नसताना ते वापरले जात आहेत, असे सांगून सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोरगावचे सरपंच केदारी एकीकडे खोटे रेकॉर्ड बनवून सरकारची दिशाभूल करीत आहेत, तर दुसरीकडे ग्रामपंचायतीतही बोगस कारभार सुरू आहे, त्यामुळे संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ढोले यांनी केली.

 
सरकारी यंत्रणेची बघ्याची भूमिका ः ढोले
""गेली सात वर्षे धूळखात असलेले बाजारओटे न वापरताही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोडकळीस आले आहेत. ते न वापरता भविष्यात त्यावर दुरुस्तीसाठी खर्च करावा लागणार आहे. सरकारी यंत्रणेने याकडे बघ्याची भूमिका घेतली आहे,'' असा आरोप माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी केला.

ग्रामपंचायतीकडून बाजारओट्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. लवकरच त्याठिकाणी आठवडे बाजार स्थलांतर केला जाईल. ग्रामपंचायत बाजारओट्यांचा वापर निश्‍चितपणे करणार आहे.
-नीलेश केदारी,
सरपंच, मोरगाव (ता. बारामती)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morgaon Gram Panchayat gives false information!