
हवेली उपविभागातील सर्व मस्जिद मधील पहाटेची अजान लाऊडस्पीकर विना...
किरकटवाडी: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली उपविभागातील एकूण नऊ मस्जिद मध्ये पहाटेची अजान लाऊड स्पीकर विना घेण्यात आली आहे. सर्व मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याची ग्वाही दिल्याची माहिती हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी दिली आहे. हवेली उपविभागात पौड, हवेली व वेल्हे या तीन पोलीस ठाण्यांची हद्द येते. यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पौड,पिरंगुट,घोटावडे व उरावडे अशा चार, हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला व डोणजे अशा दोन व वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेल्हे,साखर व कातवडी या तीन अशा एकूण नऊ मस्जिद आहेत.
या सर्व मस्जिद व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नियमांचे पालन करत हवेली उपविभागातील सर्व मस्जिद मध्ये पहाटेची अजान लाऊड स्पीकर विना घेण्यात आली आहे. तसेच इतर धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. "खुप वर्षांपासून आम्ही हिंदू, मुस्लिम व इतर धर्मीय सामाजिक सलोखा टिकवून राहत आहोत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो व त्याचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत.पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार." मोहम्मद अशरफ शेख, मौलाना, पिरंगुट मस्जिद."या अगोदरही आम्ही नियमाचे पालन करत आलो आहोत. सर्व धर्मियांसोबत आपुलकीचे संबंध असल्याने सर्वांचे सण उत्साहाने साजरे होतात. अजान देताना यापुढेही नियम पाळणार आहोत." नूर सय्यद, अध्यक्ष बिलाल मस्जिद ट्रस्ट, खडकवासला.
"आम्ही मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांच्या वेळी लाऊड स्पीकरचा वापर करत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे यापुढे आम्ही लाऊड स्पीकर वापरासाठी पूर्वपरवानगी घेऊनच वापर करणार आहोत."
- रमेश माताळे, पुजारी, बापुजी बुवा मंदिर, गोऱ्हे बुद्रुक
"उपविभागातील सर्व मंदिर व मस्जिद व्यवस्थापकांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुर्वी आम्ही सामाजिक सलोखा टिकवून ठेवला आहे व यापुढेही टिकवून ठेवू अशी ग्वाही दिली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."
- भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण