डासांच्या उत्पत्तीवरून वीस जणांना दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

डासांच्या उत्पत्तीची कारणे
    कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन
    पाणीपुरवठ्याचे सदोष व्यवस्थापन
    पाण्याचे दुर्भिक्ष, अनियमित पाणीपुरवठा
    सोसायट्यांच्या परिसरात साचलेले पाणी
    टायर, करवंट्या, फुटलेल्या काचांमध्ये साठलेले पावसाचे पाणी

डेंगीची लक्षणे
    अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी
    भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी 
    हात-पाय, चेहरा, मानेवर पुरळ येतात

पुणे - तुम्ही सोसायटीचे अध्यक्ष आहात का? बांधकाम व्यावसायिक आहात का? किंवा तुम्ही कोणत्या मोकळ्या जागेचे मालक आहात का? तुमच्या नावावर सदनिका आहे? या प्रश्‍नांची उत्तरे ‘हो’ असल्यास तेथे त्या जागेत डासांची पैदास होणार नाही, याची आवर्जून काळजी घ्या. कारण, डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याने वीस जणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे.

दंड ठोठावणाऱ्यांमध्ये सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि बांधकामांची ठिकाणे यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या अध्यक्षांनो, तुम्ही तुमच्या सोसायटीच्या परिसराची पाहणी करा. तेथील डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे प्राधान्याने नष्ट करा.

खासगी मिळकतींमधून डासांची बेसुमार उत्पत्ती होते. त्यावर नियंत्रण ठेवणे हे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यातून शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे महापालिकेने आता डासांच्या उत्पत्तीस जबाबदार असलेल्यांवर खटले दाखल करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यापैकी २० जणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. मलेरिया सर्वेलन्स इन्स्पेक्‍टर उत्तम बांदल आणि निलांबन खरात यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले.

नोटीस गांभीर्याने घ्या
शहराच्या वेगवेगळ्या भागांत डासोत्पत्तीच्या ठिकाणांचे नियमित सर्वेक्षण सुरू असते. शाळा, सहकारी गृहनिर्माण सोसायट्या, बांधकामांची ठिकाणे, रुग्णालये, सरकारी आस्थापना, शाळा, महाविद्याये अशा विविध भागांत हे सर्वेक्षण होत आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्यास महापालिकेतर्फे पहिली नोटीस बजाविण्यात येते. ती नोटीस तुम्ही गांभीर्याने घ्या. नोटीस बजाविल्यानंतर डासांच्या उत्पत्तीची स्थळे नष्ट केली आहेत का, याची तपासणी होते. ती नष्ट केली नसतील, तर पुन्हा दुसरी नोटीस दिली जाते. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्यास खटला दाखल केला जातो. 

दोन संधी देऊनही मिळकतींमधील डासांची पैदास न रोखणाऱ्यांविरोधात महापालिकेतर्फे खटला दाखल करण्यात आला होता. त्यातील २० जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mosquito Dengue Sickness Healthcare