‘डासमुक्त गाव’ची जिल्ह्यात संकल्पना

Mosquito
Mosquito

भवानीनगर - जिल्ह्यात ‘डासमुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी पुण्यातील आरोग्य समितीच्या बैठकीत सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची विशेष बैठक जिल्हा परिषदेत सोमवारी संध्याकाळी झाली. या विशेष बैठकीत जिल्ह्यातील साथरोग आटोक्‍यात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीत इंदापूर तालुक्‍यातील सणसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, सणसर विकास मंच, ग्रामपंचायत, छत्रपती कारखाना व छत्रपती वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेली तीन वर्षे सुरू असलेल्या डेंगी निर्मूलन मोहिमेचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यल्प खर्चात गावागावांतील विषाणूजन्य आजार, डासांचे निर्मूलन करता येऊ शकते, याचे सादरीकरण सणसरचे उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बी. व्ही. चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. 

या मोहिमेची आखणी केलेले पुष्पराज निंबाळकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे पद्माकर धर्माधिकारी, प्रमोद पाठक आदींनी माहिती दिली. बैठकीत प्रवीण माने यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, अभिजित तांबिले, नितीन मराठे, विठ्ठल आवाळे, गुलाबशेठ पारखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, हिवताप अधिकारी डॉ. अजय बेंद्रे व सर्व तालुक्‍यांचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रवीण माने यांनी ‘सणसर पॅटर्न’नुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आरोग्य केंद्राने डास निर्मूलनाची मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या. डॉ. दिलीप माने यांनीही या मॉडेलच्या तांत्रिक बाजू तपासून जिल्ह्यात सर्वत्र साथरोग आटोक्‍यात आणण्यासाठी लोकसहभागावर आधारित ही मोहीम राबविण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅमी फलूचा पुरेसा साठा
प्रवीण माने म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आरोग्य खात्याने सर्व ९६ आरोग्य केंद्रांवर टॅमी फ्लूचा पुरेसा साठा ठेवला आहे. सध्या विषाणूजन्य आजाराची साथ आहे. मात्र, लोकांनी न घाबरता आवश्‍यकतेप्रमाणे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. साथरोग आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वांचीच सहकार्याची गरज आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com