मॉन्सून 30 मेपर्यंत केरळात येणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मॉन्सून केरळात दाखल झाल्याचा गेल्या पाच वर्षांतील कालावधी : 
वर्ष : मॉन्सून दाखल झालेला दिवस : वर्तविण्यात आलेला अंदाज 
2012 : 5 जून : 1 जून 
2013 : 1 जून : 3 जून 
2014 : 6 जून : 5 जून 
2015 : 5 जून : 30 मे 
2016 : 8 जून : 7 जून 

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी नैर्ऋीत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या आणि उत्तर अंदमान समुद्राच्या आणखी काही भागांपर्यंत मजल मारली आहे. मॉन्सूनने अंदमान-निकोबारचा बराचसा भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याने पावसाचे ढग घेऊन येणारे हे मोसमी वारे येत्या 30 मेपर्यंत केरळमध्ये येऊन धडकण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. 

मॉन्सूनने मंगळवारी आणखी प्रगती करत बहुतांश अंदमान आणि निकोबार बेट व्यापले आहे. अंदमानात सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून, ही स्थिती मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पूरक आहे. त्यामुळे मोसमी वारे बुधवारी बंगालच्या उपसागारात आणखी आगेकूच करतील. मॉन्सूनची ही वाटचाल अशीच कायम राहिल्यास मोसमी वारे श्रीलंका आणि केरळात सर्वसाधारण कालावधीपूर्वी दाखल होतील, असा अंदाज आहे. 

सर्वसाधारणपणे मॉन्सून एक जूनला केरळात दाखल होतो. मात्र या वर्षी मॉन्सूने अंदमानात सर्वसाधारण तारखेच्या सात दिवस आधी हजेरी लावल्यानंतर सगळ्याचे लक्ष मॉन्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागून राहिले होते. गेल्या दोन दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा प्रवास विनाअडथळा सुरू असून, ही वाटचाल अशीच राहिल्यास मोसमी वारे सर्वसाधरण तारखेपूर्वी पुढे सरकण्याची शक्‍यता आहे. 

अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, हा पट्टा बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. आंध्र प्रदेशचा उत्तर भाग ते तमिळनाडू या दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या दक्षिण आणि पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे. 

विदर्भात उष्णतेची लाट कायम 

दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी (ता. 18) आणि शुक्रवारी (ता. 19) पाऊस होण्याची शक्‍यता आहे. तर गुरुवारपर्यंत (ता. 18) विदर्भात उष्णतेची लाट राहील. पुण्यातही येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहील, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. 

Web Title: Mosson arrives in Kerala until May 30