सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी, सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या असून, नागरिकांनी बारा दिवसांत शंभरहून अधिक तक्रारी केल्या आहेत. 

पुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी, सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या असून, नागरिकांनी बारा दिवसांत शंभरहून अधिक तक्रारी केल्या आहेत. 

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या पोलिसांकडे मांडण्यासाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक दिला. पोलिस त्यावर उपायोजना करतील, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आठ ऑगस्टपासून व्हॉट्‌सऍप क्रमांक कार्यान्वित झाला. 

पोलिसांच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकाकवर 8 ते 19 ऑगस्ट या 12 दिवसांच्या कालावधीत 295 तक्रारी आल्या. या तक्रारींचे पोलिस प्रशासनाने विश्‍लेषण केले. त्यामध्ये नागरिकांनी सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीसंदर्भात केल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात सोमवारी (ता. 13) शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कात्रज, वडगाव धायरी, नऱ्हे, वारजे माळवाडी, कोथरूड या परिसरांसह शिवाजीनगर, चतु-शृंगी, रामटेकडी, सेनापती बापट या रस्त्यांवरील वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे या एकाच दिवशी वाहतूक कोंडीबाबत 21 तक्रारी पोलिसांकडे आल्या. 

तक्रारींसाठी पोलिसांचा व्हॉट्‌सऍप क्रामांक - 8975283100 

पाऊस, विकासकामे, बंद बस, पाणी वाढल्याने नदीपात्रातील रस्ता बंद असणे, चारचाकी मोठ्या संख्येने रस्त्यावर येणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून वाहतूक कोंडीकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही. ही समस्या सोडविण्यासाठी आमचे सर्वाधिक प्राधान्य आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी महापालिका, पीएमपी, मल्टिप्लेक्‍स, मॉल्स व अन्य मोठ्या कंपन्यांसमवेत आम्ही लवकरच बैठक घेऊन मार्ग काढणार आहोत. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. 
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त 

पोलिसांकडे आलेल्या तक्रारी 
तक्रारींचे स्वरूप तक्रारींची संख्या 
वाहतूक - 109 
वैयक्तिक - 90 
ध्वनिप्रदूषण - 28 
अवैध धंदे - 21 
चौकशी - 15 
पर्स चोरी - 03 
आर्थिक गुन्हे - 01 
ग्रामीण विभाग - 02 

"मी गणेशखिंड येथे कामाला आहे. 13 ऑगस्टपासून सिंहगड रस्ता व परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी सकाळीही वाहतूक कोंडीमुळे ऑफिसला जायला दीड तास उशीर झाला. वाहतूक कोंडीचा त्रास दररोजच होत असून, पोलिस व महापालिका प्रशासनाने हा प्रश्‍न कायमचा संपवावा. 
- विकास कदम, नोकरदार, धायरी

Web Title: Most complaints of traffic