घर, सोसायट्यांत सर्वाधिक अळ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

डासोत्पत्ती नियंत्रणासाठी धूर, औषध फवारणी करण्यात आली असून, बांधकाम व्यावसायिकांची बैठक घेऊन तेथे साठविण्यात येणाऱ्या पाण्यात डासोत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले. 

डेंगी डासांच्या सर्वेक्षणाबाबत नागरिक उदासीन

पुणे - शहरात डेंगीच्या डासांच्या सर्वाधिक अळ्या घर आणि सोसायट्यांच्या परिसरात सापडल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविले आहे. नागरिक
घरात येऊन सर्वेक्षण करू देत नसल्याचेही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण शहर डेंगीच्या डंखाने हैराण झाले आहे. सोमवारी एका दिवसात डेंगीचे 90 रुग्ण सापडल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. गेल्या 26 दिवसांमध्ये डेंगीच्या 738 संशयित रुग्णांची नोंद महापालिकेकडे झाली आहे. त्यापैकी 181 रुग्णांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंगीची हा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असली तरीही त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, ‘शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये डेंगीच्या डासांची पैदास होत असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शहरात सर्वेक्षण करण्यात आलेल्या साडेसात हजारांपैकी बहुतांश घरांमध्ये डेंगीच्या डासांच्या अळ्या सापडल्या.‘‘
जनजागृतीसाठी महापालिकेचा पुढाकार

शहरात उद्रेक झालेली डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी म्हणाले, ""नाट्यगृहांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डेंगीबाबतची माहिती आणि डासोत्पत्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची माहिती दिली जात आहे. ही माहिती चार लाख नागरिकांना "एसएमएस‘द्वारे पाठविण्यात आली आहे.‘‘

Web Title: most larvae in societies