पुण्यात सातारा रस्त्यावर सर्वाधिक खड्डे 

mostly potholes on satara road in Pune
mostly potholes on satara road in Pune

पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी सर्वाधिक खड्डे सी. डी. देशमुख (पुणे- सातारा) रस्त्यावर असल्याचे "इन-रोड्‌स' या स्टार्ट अपच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरही प्रत्येकी चार छोटे-मोठे खड्डे असल्याचे या सर्वेक्षणात पाहायला मिळाले. 

शहर खड्डेमुक्त करण्याचे आश्‍वासन राजकीय पक्षांकडून दिले जाते; पण शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, त्याची तीव्रता काय आहे आणि ते नेमके कुठे आहेत, याचा कोणताही साधार तपशील उपलब्ध नसतो. असा तपशील लोकसहभागातून (क्राउडसोर्सिंग) मिळविण्यासाठी "इनरोड्‌स' या मोबाईल ऍप्लिकेशन आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग कॅपजेमिनी कंपनीतील टेस्टिंग सोल्यूशन्स विभागाचे उपाध्यक्ष अजय वालगुडे आणि त्यांचे सहकारी प्रसाद वाटवे यांनी नुकताच केला. सातारा रस्त्यावर पद्मावती आणि भारती विद्यापीठजवळ, कर्वे रस्त्यावर बॅंक ऑफ इंडियाजवळ, गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंक गल्लीजवळ, जंगली महाराज रस्त्यावर जंगली महाराज मंदिराजवळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मार्केटजवळ सर्वांत मोठे खड्डे असल्याचे दिसून आले. 

अजय वालगुडे म्हणाले, "सरकारने खड्डे दुरुस्तीसाठी किती निधीची तरतूद करावी, यासाठी हे ऍप उपयुक्त ठरू शकते. प्रसारमाध्यमांनाही खड्ड्यांविषयी वार्तांकन करताना अचूक माहिती मिळू शकते. एखादा रस्ता चांगला आहे की खराब याचे प्रमाणपत्र महापालिका अधिकारी किंवा ठेकेदाराकडून घेण्याऐवजी सामान्य नागरिकांच्या थेट अभिप्रायाच्या आधारे मिळू शकते.'' 

"खड्ड्याचा आकार, तीव्रता व संख्या मोजण्यासाठी तसेच वाहनाचा किमान वेग समजण्यासाठी मोबाईलमध्ये असलेल्या ऍक्‍सलरोमीटर आणि गायरोमीटरच्या मदतीने नोंदी घेतल्या गेल्या. गुरुत्वाकर्षण बलानुसार खड्ड्याची तीव्रता समजते.

वेगनियंत्रकामुळे बसलेल्या हादऱ्याची गणना खड्डा म्हणून होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली होती. खड्ड्यांमुळे तुम्हाला व तुमच्या वाहनाला कसे व किती नुकसान होत आहे, याबाबतही माहितीही आता मिळू शकेल. खड्ड्यांविषयीच्या सर्व माहितीचे विश्‍लेषण करून त्याचा अहवाल केंद्र, राज्य सरकारांपासून स्थानिक महापालिकांना देण्याची व्यवस्थाही केली आहे,'' असे प्रसाद वाटवे यांनी सांगितले. 

तुम्हीपण व्हा सहभागी 
"इनरोड्‌स' या मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने कोणताही सर्वसामान्य माणूस या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. हे ऍप मोफत असून, अधिकाधिक नागरिकांनी वापरल्यास त्याचा उपयोग महापालिकेचा कारभार सुधारण्यासाठी होऊ शकेल. सुशासनाच्या आश्‍वासनांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसाठीही हे ऍप उपयुक्त आहे. आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्या रस्त्यावर व कुठे खड्डे आहेत, याची माहिती लोकप्रतिनिधींना सहज सोप्या पद्धतीने मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com