जन्मदात्यांकडून मुलगी थेट अनाथालयात

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 15 जून 2018

तुम्ही काय करणार?
या जगात आली हाच काय या निरागस नवजात जिवाचा दोष? हा तिचा दोष वाटत नसल्यास तुम्ही स्वतः तिच्यासाठी काही करण्याचा पुढाकार घ्याल?
- या घटनेसंदर्भात आपली मते पाठवा फेसबुकवर आणि ट्विटरवर
- ई-मेल कराः webeditor@esakal.com वर

सांस्कृतिक राजधानी पुण्यातील घटना

पुणे : चौथीही मुलगीच झाली म्हणून घराच्या उंबऱ्यातूनही आत न घेता खुद्द जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला रुग्णालयातून थेट अनाथालयाचा रस्ता दाखविल्याची खळबळजनक घटना राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणविणाऱ्या पुण्यात घडली आहे. अनेक पद्धतीने समुपदेशन करूनही यश न मिळाल्याने अखेर जन्मदात्यांच्या समोरच त्या नवजात मुलीला अनाथ म्हणून स्वीकारण्याचा आदेश बालकल्याण समितीला द्यावा लागला.

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा; हा विचार आपल्या मनावर इतका पक्का बिंबविला गेला आहे, की त्यापुढे मानवी भावना, संवेदना इतकेच काय, तर मातृत्वदेखील अक्षरशः कोरडे होते, हेच या घटनेतून दिसून येते. या दांपत्याला सुरवातीला दोन मुली झाल्या. मुलगाच पाहिजे या हट्टासाठी त्यांनी तिसरा "चान्स' घेतला. त्या वेळी मुलगीच झाली, म्हणून पुन्हा प्रयत्न केला. मात्र चौथ्यावेळीही त्यांना मुलगी झाली. त्यामुळे या नवजात मुलीला घरी घेऊन न जाता रुग्णालयातून थेट अनाथालयात नेले.

आई-वडील असताना मुलीला अनाथ कसे म्हणायचे, हा स्वाभाविक प्रश्न बालकल्याण समितीच्या सदस्यांना पडला. असा बाका प्रसंग बालकल्याण समितीपुढे पहिल्यांदाच निर्माण झाला होता. समितीच्या सदस्यांनी त्या मुलीच्या आई-वडिलांना समजाविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण पाषाण हृदयाचे जन्मदाते आम्ही हिला घरी घेऊन जाणार नाही, यावर ठाम होते. या मुलीला आता आपण स्वीकारले नाही, तर नुकत्याच जगात आलेल्या या निरागस पिलाच्या जिवालाच धोका असल्याचे स्पष्ट संकेत समितीला जन्मदात्यांशी बोलताना मिळू लागले. त्यामुळे निष्पाप जिवाच्या संरक्षणासाठी बालकल्याण समितीने अखेर मुलीला अनाथालयात पाठविण्याचे आदेश दिले.

नवजात मुलीची काळजी आणि सुरक्षेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात तिला अनाथालयात दाखल करून घेण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या आई-वडिलांना परत बोलाविण्यात येईल, असे बालकल्याण समितीतर्फे सांगण्यात आले.

Web Title: mother and father Girl direct Orphanage