सात मुलांना सांभाळणे अवघड झाल्याने आईनेच केले 'हे' कृत्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मजुरी करणाऱ्या लक्ष्मीला चार मुलगे व तीन मुली सांभाळता येणे कठीण झाले होते. त्यामुळे तिने दोन महिन्यांच्या बाळाला अपत्य नसलेल्या महिलेला दिले. मात्र, मद्यपी नवऱ्याला ही बाब कळाल्यानंतर तो मारहाण करेल, या भीतीने तिने बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव केला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी आठ दिवस कसून शोधमोहीम राबविली. अखेर लक्ष्मीची उलटतपासणी घेतली, तेव्हा तिनेच हा बनाव रचल्याचे उघड झाले. 

येरवडा : मजुरी करणाऱ्या लक्ष्मीला चार मुलगे व तीन मुली सांभाळता येणे कठीण झाले होते. त्यामुळे तिने दोन महिन्यांच्या बाळाला अपत्य नसलेल्या महिलेला दिले. मात्र, मद्यपी नवऱ्याला ही बाब कळाल्यानंतर तो मारहाण करेल, या भीतीने तिने बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव केला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी आठ दिवस कसून शोधमोहीम राबविली. अखेर लक्ष्मीची उलटतपासणी घेतली, तेव्हा तिनेच हा बनाव रचल्याचे उघड झाले. 

लक्ष्मी राजू उर्फ बाळू चव्हाण (वय 35, रा. जेजुरी रेल्वे स्टेशन, मूळगाव अंकेला कोंडापूर तांडा, मेहबूबनगर, हैदराबाद) यांनी बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी जेजुरी ते लोणावळादरम्यान बाळाला शोधण्याची मोहीम राबविली. मात्र, अपयश येत होते. पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांना लक्ष्मी यांच्याबाबत संशय आला. त्यांनी तिची उलटतपासणी घेतली, तेव्हा लक्ष्मी यांनी चार मुलगे आणि तीन मुली असल्यामुळे सात मुलांना सांभाळणे अवघड झाले होते, असे सांगितले. 

सातव्या मुलाचे पालनपोषण चांगले होईल, या उद्देशाने त्यांनी बाळाला निर्मला बाबू साठे व बाबू भीमराव साठे (रा. शांतीनगर) यांना दिल्याचे कबूल केले. हा प्रकार पतीला समजल्यास तो मारहाण करेल, या भीतीने त्यांनी जेजुरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन येथून झोळीत झोपलेल्या बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव केला होता. पोलिसांनी साठे यांच्याकडून बाळाला ताब्यात घेऊन लक्ष्मीच्या ताब्यात दिले. पोलिस अधीक्षक दीपक साकोरे, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे, विशाल पाटोळे, सचिन राठोड यांनी तपास केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother Did child's fake kidnapping in pune