‘मदर मिल्क बॅंक’ बालकांसाठी वरदान

आशा साळवी
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पिंपरी - अनेकदा विषम परिस्थितीमध्ये नवजात बालकांना आईचे दूध (स्तन्यपान) मिळत नाही. त्यामुळे बालकांना पुढे शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. अशा बालकांसाठी ‘मदर मिल्क बॅंक’ वरदान ठरत आहे. 

पिंपरी - अनेकदा विषम परिस्थितीमध्ये नवजात बालकांना आईचे दूध (स्तन्यपान) मिळत नाही. त्यामुळे बालकांना पुढे शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. अशा बालकांसाठी ‘मदर मिल्क बॅंक’ वरदान ठरत आहे. 

शहरात पहिली ‘मदर मिल्क बॅंक’ डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये रोटरी क्‍लब ऑफ मुंबईच्या मदतीने २०१३ मध्ये सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अहवालानुसार शहरी भागात दहापैकी चार नवजात बालकांना जन्मानंतर लगेच आईचे दूध मिळत नाही. जन्माच्या एक तासाच्या आत मिळणारे आईचे दूध बालकांना अमृतासमान असते. अनेक आजारांना लढण्याची ताकद देते; पण आजच्या जीवनशैलीमुळे वेळेअगोदरच प्रसूती होते. अनेक प्रकरणांमध्ये प्रसूतीनंतर आईला दूध येत नाही अथवा बऱ्याचदा आई दगावते. अशावेळी नवजात बालके आईच्या दुधापासून वंचित राहतात; तर कमी वजनाच्या तसेच कमी दिवसांच्या बालकांना ‘मदर मिल्क बॅंक’ जीवनदायिनी ठरत आहे. 

मात्र, जागृतीअभावी या बॅंकेमध्ये केवळ डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या महिलाच दूध दान करत असल्याची माहिती मदर मिल्क बॅंक प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी दिली.

‘मदर मिल्क कलेक्‍शन सेंटर’ 
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने रोटरी ऑफ निगडीच्या सहकार्याने ‘मिल्क कलेक्‍शन सेंटर’ सुरू करणार आहेत. ज्या मातांना दूध दान करण्याची इच्छा आहे, पण वेळेअभावी पोचू शकत नाही. अशांसाठी ‘मिल्क व्हॅन’ सुरू करण्याचे नियोजन असल्याचे विभाग प्रमुख डॉ. शरद आगरखेडकर यांनी सांगितले.

असे मिळवतात दूध
माता दूधदाता (डोनर) कडून इलेक्‍ट्रिक ब्रेस्ट पंप मशिनद्वारे दूध घेतले जाते. ते पाश्‍चराईज्ड केले जाते. त्यानंतर त्या दुधाची लॅबमधून ‘मायक्रो बायोलॉजिकल’ टेस्ट केली जाते. दुधाच्या गुणवत्तेनंतर आणि प्रमाणानुसार प्रत्येक मातेचे दूध काचेच्या बाटलीमध्ये मायनस ० ते ८ डिग्री सेल्सियसमध्ये ठेवले जाते. या बॅंकेमध्ये सहा महिन्यांपर्यंत दूध संकलित केले जाते. त्यासाठी मायनस ८ ते २० डिग्री सेल्सियसनुसार डीप फ्रिजमध्ये सुरक्षित राहते. गरजेनुसार नवजात बालकांना दूध देण्यात येते.

स्तन्यपानाचे फायदे
 मातेचे दूध मिळाल्याने बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांनी कमी होते.
 नवजात बालकांचा न्यूमोनिया, अतिसारासारख्या आजारांपासून बचाव
 सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूध मुलांचे सर्वतोपरी पोषण करते.
 माताही ‘स्तनाच्या कर्करोगा’पासून बचावू शकतात.

Web Title: Mother Milk Bank gift for the children