नको गं बाई, नोकरदार आई!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍नोत्तरांना सामोरे जावे लागत आहे. ‘तुम्ही गृहिणी आहात का?’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना?’, अशा प्रश्‍नांचा भडिमार पालकांवर होत आहे. पालकांपैकी एक जण तरी कायम घरी असावा, किंबहुना आई गृहिणी असावी, असा प्रवेशाचा अप्रत्यक्ष आणि अजब निकष काही शाळा लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पूर्वप्राथमिकच्या प्रवेशाची लगबग सध्या सुरू आहे. बहुतेक शाळांत नर्सरी प्रवेशाचे फलक झळकू लागले आहेत. काही शाळा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांवर काही अटी अप्रत्यक्षरीत्या लादू पाहत आहेत. ‘‘तुमच्या मुलाला आम्ही प्रवेश देतो; परंतु त्याचा अभ्यास घेण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही घरी असणार ना?,’’ असा प्रश्‍न विचारण्यात आल्याचे विशाखा पांडे (नाव बदलले आहे) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांकडून अभ्यास, प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी पालकांनी वेळ द्यावा, इतपत ठीक आहे; परंतु आई- वडिलांपैकी एकाने पूर्ण वेळ घरी असावे. विशेषतः आई ही गृहिणी असेल, तर त्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे निरीक्षण श्‍वेता गवळी (नाव बदलले आहे) यांनी नोंदविले. त्या म्हणाल्या, ‘‘मुळात मी गृहिणी असल्यामुळे काही प्रश्‍न नाही; परंतु मुलांच्या प्रवेशावेळी अशी विचारणा होणे, जरा खटकले.’’ मुलाला शाळेतील प्रवेश मिळताना काही अडचण येऊ नये, म्हणून पिंपरी- चिंचवडमधील एका आईने नोकरी सोडल्याचा अनुभव सांगितला.

विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणत्याही प्रकारची निवडप्रक्रिया असू नये. केवळ प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी. शाळांच्या अटीबाबत पालकांनी तक्रार केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.
- मीनाक्षी राऊत,  प्रभारी शिक्षण उपसंचालक

विद्यार्थ्याला प्रवेश देताना शाळा पालकांवर अशा प्रकारे कोणत्याही अटी लादू शकत नाहीत. अशा प्रकारे कोणती शाळा पालकांना अप्रत्यक्षरीत्या अटी घालत असल्यास, संबंधित शाळेला संघटनेकडून पत्र पाठविण्यात येईल. 
- राजेंद्र सिंह, प्रदेश कार्याध्यक्ष, इनडिपेन्डट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (आयईएसए)

Web Title: Mother should be housewife for admission to the school criteria