मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

औंध रुग्णालयातील स्थिती; कक्षाचे नूतनीकरण रखडल्याचा परिणाम  

पुणे - औंध रुग्णालयातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया गेल्या दीड महिन्यापासून ठप्प झाल्या आहेत. येथील शस्त्रक्रियेचा कक्ष प्रसूतीसाठी वापरण्यात येत असल्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना ससून रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

औंध रुग्णालयातील स्थिती; कक्षाचे नूतनीकरण रखडल्याचा परिणाम  

पुणे - औंध रुग्णालयातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया गेल्या दीड महिन्यापासून ठप्प झाल्या आहेत. येथील शस्त्रक्रियेचा कक्ष प्रसूतीसाठी वापरण्यात येत असल्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना ससून रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

औंध रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षाचे नूतनीकरण सुरू आहे. दोन महिन्यांपासून याचे बांधकाम सुरू झाल्याने छोट्या शस्त्रक्रिया, प्रसूती, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया या कक्षामध्ये करण्यात येत आहेत. रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी कक्ष उपलब्ध नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून येथे एकही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिरे घेतली जातात. तेथून या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात आणले जाते. त्यांची शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी करून त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पैसे भरावे लागत नाहीत. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. त्यासाठी आवश्‍यक लेन्सही सरकार खरेदी करते. मात्र, औंध रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना ससून रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. 
शस्त्रक्रिया कक्षाच्या नूतनीकरणाचे काम रेंगाळले आहे. त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ शस्त्रक्रिया कक्ष बंद असल्याने प्रसूती, छोट्या शस्त्रक्रिया आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यांचे नियोजन कोलमडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

औंध रुग्णालयातून शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दीड महिन्यापासून वाढल्याचे निरीक्षण ससून रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील तज्ज्ञांनी नोंदविले. या रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण ही संख्या अचानक वाढल्याने त्याचे नियोजन करावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्रसूतीसाठी आणि छोट्या शस्त्रक्रियांसाठी कक्ष आवश्‍यक असतो. त्यामुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचा कक्ष वापरला जात आहे. इतर शस्त्रक्रिया कक्षाप्रमाणाचे डोळ्यांचा शस्त्रक्रिया कक्ष असतो. नूतनीकरण सुरू असल्याने हा कक्ष काही काळ वापरासाठी घेतला आहे. येथे होणाऱ्या मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रिया इतर रुग्णालयांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. इतर रुग्णालयांमधूनही या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्यामुळे येथील शस्त्रक्रिया कक्ष बंद केल्याने रुग्णसेवा विस्कळित होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
- डॉ. रुद्राप्पा शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक 

Web Title: motibindu surgery stop in aundh hospital