कचरा डेपोविरोधात पुन्हा आंदोलन 

कचरा डेपोविरोधात पुन्हा आंदोलन 

फुरसुंगी - पुणे महापालिकेने उरुळी फुरसुंगी येथील पालिकेच्या कचरा डेपोत राष्ट्रीय हरीत लवादाचा आदेश डावलून कचऱ्याचे ओपन डंपिंग करायाला सुरुवात केल्याचा आरोप करत उरूळी देवाची व फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी आज सकाळी कचरा डेपोवर जाऊन कचरा गाड्या अडवा आंदोलन केले. मात्र डेपोवर आंदोलन होणार असल्याची माहिती अगोदरच मिळाल्याने आज कचरा टाकण्यासाठी गाड्या आल्या नाहीत. उद्या (ता. 25) सकाळी पुन्हा महापालिका प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची डेपोवर बैठक होणार आहे. दरम्यान, पालिका जोपर्यंत ओपन डंपिंग बंद करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोवर आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

पालिकेच्या काही कचरा गाड्या डेपोत ओपन डंपिंग करताना ग्रामस्थांनी काल पकडल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या उरुळी, फुरसुंगीचे ग्रामस्थ जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी कचरा गाड्या आडवा आंदोलनासाठी डेपोवर जमले होते. मात्र संध्याकाळपर्यंत एकही गाडी ओपन डंपिंगसाठी डेपोत आली नाही. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष उरूळी देवाचीचे भगवान भाडळे, तात्यासाहेब भाडळे, विजय भाडळे, अनंता भाडळे व फुरसुंगीचे विशाल हरपळे, संजय हरपळे, दिलीप मेहता, सोमनाथ यादव, प्रवीण हरपळे, नितीन कामठे, प्रशांत कामठे यांसह दोन्ही गावचे ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलना वेळी ग्रामस्थ म्हणाले, की 31 डिसेंबरनंतर या डेपोत पालिकेला ओपन डंपिंग करण्यास राष्ट्रीय हरीत लवादाने मनाई आदेश दिला असतानाही महापालिका येथे ओपन डंपिंग करते. कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी, जलस्त्रोत प्रदूषित होणे, शेतीची नापिकी, गंभीर आजार यांचा त्रास आम्ही सत्तावीस वर्षांपासून भोगतो आहोत. महापालिकेला आम्ही सतत सहकार्य करूनही ते कचरा टाकतच राहिल्याने आम्ही राष्ट्रीय हरीत लवादात पालिकेविरोधात फिर्याद दाखल केली. त्यात कचरा न टाकण्याचे आदेश देउनही पालिका येथे ओपन डंपिंग करते. न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या पालिकेच्या विरोधात दोन दिवसांत आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करत आहोत. 

पालिकेचे घनकचरा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र तिडके यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. रविवारी चुकून थोड्या गाड्यांकडून झालेले ओपन डंपिंग पुन्हा होणार नाही, असे बैठकीत कबूल करण्यात आल्याचे तिडके यांनी सांगितले. दै "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, की 2 जानेवारीपासून ओपन डंपिंगसाठी गाड्या आल्या नाहीत. जो रिजेक्‍ट कचरा आहे तोच रोज दोनशे मेट्रिक टन डेपोवर येत आहे. अगोदर पडलेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने भूभराव करण्याचे काम सुरू आहे. 

ग्रामस्थ, पोलिसांना दुर्गंधीचा त्रास 
डेपोवर आंदोलनासाठी आलेले ग्रामस्थ, बंदोबस्तासाठीचे पोलिस यांना तेथे कचऱ्याची येणारी दुर्गंधी एवढी असह्य झाली की थोड्याच वेळात लांब अंतरावर जाऊन त्यांना थांबावे लागले. त्यामुळे आम्ही डेपोत नियमित औषधफवारणी करतो हा पालिकेचा धावा फोल ठरला. 

पालिकेला कर देणार नाही 
शहरातील कचरा कमी व्हावा, म्हणून पालिका गांडूळखत प्रकल्प राबवणाऱ्यांना करात 10 टक्के पालिका सवलत देते. आम्ही तर सत्तावीस वर्षांपासून पालिकेच्या लाखो टन कचऱ्याचा त्रास सहन करतोय, म्हणून हा डेपो जोपर्यंत कुलूपबंद होत नाही, तोवर आम्ही दोन्ही गावचे ग्रामस्थ पालिकेला कुठलाही कर देणार नाही; तसेच आंदोलन सुरूच राहणार असल्याचे उरूळीचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे यांनी बैठकीत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com