घोडेगावला डीबीटी रद्द करण्यासाठी आंदोलन

चंद्रकांत घोडेकर
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची घोषणाबाजी; सरकारचा निषेध

घोडेगाव (पुणे): शासकीय निवासी आदिवासी वसतिगृहात राज्य सरकारने सुरू केलेली डीबीटी योजना रद्द करावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. 6) दिवसभर घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी सरकारचा निषेध करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सकाळी 11 वाजता घोषणा देत ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. पाऊस पडत असल्याने प्रकल्प कार्यालयाच्या सभामंडपाखाली आंदोलन करून द्यावे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांना केली. परंतु, कार्यालयाच्या आवारात 144 कलम लागू केले असल्याने विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर आंदोलन करावे लागले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी आक्रमक विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद दुपारी 3 वाजता आंदोलनस्थळी आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. डीबीटी हा सरकारच्या स्तरावरील विषय असून, याबाबतचे आपले म्हणणे सरकारला पाठवू. प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी, वसतिगृहातील कर्मचाऱ्यांबाबतच्या तक्रारींची चौकशी करून कारवाईचे आश्वासन प्रसाद यांनी दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी डीबीटी रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संजय गवारी, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, माजी सभापती कैलासबुवा काळे, इंदूबाई लोहकरे, प्रकाश घोलप यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

संजय गवारी यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही योजना रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या वेळी गजानन डावरे, भरत तळपाडे, यादव डुडुळे, मदन पथवे, बबलू गायकवाड, बालाजी लायमोडे, सुनील शेखरे यांची भाषणे झाली.

Web Title: Movement of cancellation of dbt at ghodegaon