राष्ट्रवादी म्हणजे "ईस्ट इंडिया कंपनी' 

amar-sable
amar-sable

पिंपरी - "ईस्ट इंडिया कंपनी'ने व्यापारी हेतूने आक्रमण करून भारताला गुलाम बनविले, तसेच आक्रमण अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकर केले असून, इथल्या सुजाण नागरिकांना गुलाम बनविले आहे, असा आरोप भाजपचे खासदार अमर साबळे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभारावर बोचरी टीका केली. 

साबळे म्हणाले, ""इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून देशावर व्यापाराचा हेतू ठेवून आक्रमण केले आणि या देशाला गुलाम बनविले. महात्मा गांधी यांनी अहिंसेची चळवळ सुरू करून ईस्ट इंडिया कंपनीला हद्दपार केले. पवार यांनीही राष्ट्रवादीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडवर आक्रमण केले. गेल्या पंधरा वर्षांत इथल्या सुजाण नागरिकांना गुलाम बनविले आहे. पण, इथली जनताही महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी तत्त्वावर विश्‍वास ठेवून "राष्ट्रवादी कंपनी'ला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. 

सध्या भाजपमध्ये असलेले मोठे नेते आमचेच आहेत. ती राष्ट्रवादी (बी) आहे, अमर साबळे हेदेखील बारामतीला आमचे कार्यकर्ते होते, या अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना साबळे म्हणाले, ""लोखंडाचा अंत बाह्य शक्तीमुळे होत नाही, त्याच्या पोटातून निर्माण होणारा गंज कारणीभूत असतो. राष्ट्रवादीच्या पोटातून जन्मलेले बिभीषण (कार्यकर्ते) भाजपत आले. तेच राष्ट्रवादीला संपवतील. त्यांचे सत्ताकारण बंडखोरीतून निर्माण झाले. त्यांनी जे पेरले तेच आता उगवले.'' 

"भ्रष्ट लोकांना जेलमध्ये पाठवू' 
नैतिक अधिष्ठान नसलेला कोणताही पक्ष लोकमानसावर कायम अधिराज्य गाजवू शकत नाही, असा उल्लेख करून साबळे म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेस कायम पिंपरी-चिंचवडवर हुकूमशाही पद्धतीने राज्य करेल, अशी अजित पवार यांची भ्रामक कल्पना आहे. उपमुख्यमंत्रिपद आणि सरकार गेल्याने ते ताळतंत्र सुटल्यासारखे बडबडत आहेत. परमेश्‍वर त्यांना सद्‌बुद्धी देवो. त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करून महापालिकेतील भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी व दलालांना जेलमध्ये पाठविले जाईल.'' वास्तविक "कारभारी बदला, भाकरी फिरवा' हा मंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा; पण, आता तोच मंत्र घेऊन भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, असे साबळे यांनी स्पष्ट केले. 

शाश्‍वत विकास करणार 
एचए, स्मार्ट सिटी, मेट्रोच्या प्रश्‍नाने भाजप राजकारण करीत आहे. रेड झोनचा प्रश्‍न दोन वर्षांत सुटला नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणत आहे, त्याचे खंडन करताना साबळे म्हणाले, ""गेली पंधरा वर्षे सत्ता कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. त्या वेळी प्रश्‍न का सुटला नाही? अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेड झोन हे प्रश्‍न त्यांनीच निर्माण केले, चिघळवले. त्यांना आम्ही राजकारण करतो असे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. आम्हाला या शहराचा शाश्‍वत विकास करायचा आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो, एचए कंपनीचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. शहरासाठी नदीसुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी पुणे-लोणावळा तिसरा मार्ग, जलवाहतुकीचा पर्याय, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण एमआयडीसी या देशाच्या "डेट्रॉइट हब'ला आणखी गती देणार आहोत.'' 

नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेऊन पंतप्रधानांनी "कॅशलेस इंडिया'च्या दिशेने वाटचाल सुरू केली, असे नमूद करून साबळे यांनी जनतेने "सबका साथ सबका विकास' धोरणाचे स्वागत केले असल्याचे निदर्शनास आणून दिले. पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या दृष्टीने जनतेकडून मागविलेल्या सूचनांच्या आधारे आम्ही एक-दोन दिवसांत शहराचा विकासनामा जाहीर करणार आहोत. शहरात जनता भाजपला सत्तेवर बसवेल, असा विश्‍वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com