
भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) केबल तोडून पुन्हा "बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनाच अरेरावीची भाषा वापरणाऱ्या मुजोर ठेकेदाराला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इशारा दिला. त्यामुळे मुजोर ठेकेदार वठणीवर आला आणि मागील तीन दिवसांपासून बंद असलेली जुन्नर तालुक्यातील "बीएसएनएल'ची सेवा आज सकाळपासून पूर्ववत झाली.
नारायणगाव (पुणे) : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) केबल तोडून पुन्हा "बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनाच अरेरावीची भाषा वापरणाऱ्या मुजोर ठेकेदाराला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इशारा दिला. त्यामुळे मुजोर ठेकेदार वठणीवर आला आणि मागील तीन दिवसांपासून बंद असलेली जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, पिंपळवंडी, खोडद परिसरातील "बीएसएनएल'ची सेवा आज सकाळपासून पूर्ववत झाली.
नारायणगाव येथील जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगतच्या गटार लाइनच्या खोदाईचे काम सुरू आहे. मात्र, आमच्या कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने तीन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास येथील खोडद रस्त्यालगत जेसीबीने खोदाई केली. त्यात "बीएसएनएल'ची चारशे पेअरची केबल तुटली. त्यानंतर ठेकेदाराने लगेच पाइप टाकून व कॉंक्रिटीकरण करून तुटलेली केबल गाडून टाकली. त्यामुळे या भागातील सुमारे दोनशे फोन व ब्रॉडबॅंडसेवा विस्कळित झाली. त्यातून बॅंकेचे व व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले.
"बीएसएनएल'चे अभियंता एस. पी. जोशी, डी. व्ही. मडके यांनी कॉंक्रिटीकरण काढून तुटलेली केबल काढून देण्याची वारंवार विनंती ठेकेदाराला केली. मात्र, मुजोर ठेकेदाराने अभियंत्यांनाच उलट अरेरावीची भाषा वापरली. विनंती करूनही ठेकेदार दाद देत नव्हता. त्यामुळे याबाबतची तक्रार त्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना शुक्रवारी (ता. 15) दुपारी केली.
त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती घेऊन डॉ. कोल्हे यांनी ठेकेदाराला सुनावले. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या ठेकेदाराने शुक्रवारी रात्री दहा ते आज पहाटे तीन वाजण्याच्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून गाडलेली केबल काढून दिली. त्यानंतर आज सकाळी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने केबलची जोडणी करून विस्कळित झालेली सेवा पूर्ववत केली.
त्यामुळे मागील तीन दिवसांपासून ठप्प झालेले बॅंक, पतसंस्था व व्यापारी वर्गाचे व्यवहार सुरळीत झाले. डॉ. कोल्हे यांनी तातडीने दखल घेतल्यानेच हे शक्य झाल्याची भावना जोशी यांनी व्यक्त केली.