
Girish Bapat : व्हिलचेअरवर येऊन खासदार गिरीश बापट यांचे मतदान
पुणे : कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन रविवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मतदान केले. यावेळी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
कसब्याच्या निवडणुकीसाठी भाजप - शिवसेना महायुतीचे हेमंत रासने तर, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी दोन्ही पक्षांनी आज प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
बापट मतदान करणार की, नाही, या बद्दल औत्सुक्य होते. परंतु, बापट सायंकाळी पाचच्या सुमारास शनिवार पेठेतील अहल्यादेवी प्रशालेत आहे. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी गिरीजा आणि मुलगा गौरव उपस्थित होते. बापट यांना व्हिलचेअरवरून मतदान केंद्रात नेण्यात आले.
बापट अहल्यादेवीत मतदानासाठी येणार हे समजल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी महापौर अंकुश काकडे, श्रीकांत पाटील,
कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेनेचे अजय भोसले यांनीही तेथे उपस्थित राहून बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या. या पोटनिवडणुकीतील उमेदवार हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मतदान करून बाहेर पडल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोलणे शक्य नसल्याचे बापट यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. बापट मोटारीत बसत असताना कार्यकर्त्यांनी पुण्याची ताकद, गिरीश बापट, अशा जोरदार घोषणा दिल्या.
कसबा विधासनसभा मतदारसंघातून बापट १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. २०१७ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात सुमारे ५ लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. तत्पूर्वी महापालिकेतही नगरसेवक म्हणून ते तीन वेळा निवडून आले होते.
१९८६-८७ मध्ये ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला करण्यात बापट यांनी मोठे प्रयत्न केले. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजपपुढे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी रविंद्र धंगेकर यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे.