मतदार संघातील मुलभुत प्रश्न मार्गी लावण्यात यश - खा. सुप्रिया सुळे 

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बारामती लोकसभा मतदार संघातील उदयोजक व तत्सम संस्थाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवुन देण्यास यापुढील काळात सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

भिगवण - बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते, शाळा, आदी मुलभुत मार्गी लावण्यात यश आले आहे. सध्या तरुणांसाठी रोजगार हा मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या धोरणामुळे आहे त्या नोकऱ्यांवरही गदा आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील उदयोजक व तत्सम संस्थाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवुन देण्यास यापुढील काळात सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
    
भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद मतदार संघातील पोंधवडी (ता. इंदापुर) येथे गावभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अमोल भिसे, डी. एन. जगताप, विजयराव शिंदे, सचिन सपकळ, नानासाहेब बंडगर पोंधवडीच्या सरपंच राणीताई बंडगर, उपसरपंच मिराताई भोसले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरुन पोंधवडी गावांमध्ये प्रवेश करण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो त्यामुळे अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे या ठिकाणी भुयारी बोगदा मंजुर करावा, मदनवाडी पोंधवडी रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच बिल्ट पेपर कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगारांसाठी प्राधान्य देण्याच्या सुचना कराव्यात आदी मागण्या केल्या. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या सबंधित विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा करुन पुर्ण करण्यासाठी प्राधान्य राहील. पोंधवडी येथील राष्ट्रीय महामार्गावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बोगद्याची मागणी न्याय आहे. बोगद्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडे पाठपुरावा करु असे सुळे यांनी सांगितले. 
    
यावेळी घरकुल योजनेच्या लाभार्थींना खासदार सुळे व आमदार भरणे यांचे हस्ते मंजुरीचे प्रदान करण्यात आले. गावभेटी दरम्यान महिलांना खासदार सुळे यांचेशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नानासाहेब बंडगर, बाळासाहेब खारतोडे, दत्तात्रय हरिबा पवार, अनिता काशीद यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. तुळशीराम खारतोडे, सुत्रसंचालन तुकाराम पवार आभार सरपंच राणीताई बंडगर यांनी मानले.

Web Title: MP Supriya Sule Talks About Basic Problems In constituency