राज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत बायोमेट्रिक हजेरी न घेतल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी सुमारे तीन लाख ८१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होत. राज्यातील सुमारे एक हजार ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील पेपर- एक आणि पेपर- दोन आज झाला. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी साडेआठच्या सुमारास परीक्षा केंद्रांवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रांवर पोचल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. 

याबाबत उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, आयोगाने बायोमेट्रिक हजेरी घेऊ नये, असे सांगितल्याचे कारण देण्यात आले.

परीक्षेदरम्यान बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आयोगाने घोषित केले असले, तरीही अद्याप सर्व परीक्षांना बायोमेट्रिक हजेरी घेतली जात नाही. केवळ मुख्य परीक्षेसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य आहे.
- सुनील अवताडे, उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

राज्यसेवा पूर्वपरीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी न घेता शाईने अंगठ्याचे ठसे उमटवून हजेरी घेण्यात आली. परीक्षाआधी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी कोणत्याही केंद्रावर घेतली नसल्याचे निदर्शनास आले.
- सूरज राठोड, परीक्षार्थी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC Exam Biometric Presenty