एमपीएससीचा निकाल सहा महिने प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे - अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी परीक्षा झाली, मुलाखती झाल्या; परंतु सहा महिने उलटले, तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला नसल्याची तक्रार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे - अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी परीक्षा झाली, मुलाखती झाल्या; परंतु सहा महिने उलटले, तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला नसल्याची तक्रार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

आयोगाने अन्न सुरक्षा अधिकारी या पदासाठी 48 जागांची जाहिरात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या वर्षी मार्च महिन्यात परीक्षा झाली. त्याचा निकालही आयोगाने 28 जून रोजी जाहीर केला. त्यानंतर जुलै महिन्यात मुलाखती झाल्या. परंतु, अद्याप अंतिम निकाल परीक्षार्थींना दिला जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील पदे रिक्त आहेत. या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना रिक्तपदे भरणार असल्याचे घोषित केले आहे. तरीही आयोगाकडून अजूनही निकाल दिला जात नाही. या परीक्षेत 169 विद्यार्थी पात्र ठरले होते.

'आम्हाला भरतीबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने आम्ही तणावाखाली आहोत,'' असे विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, 'कायदेशीर प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लांबू शकतो; परंतु या प्रकरणी अधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.''

"काम नसेल, तर शेती करा'
अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या मुलाखती होऊनही अंतिम निकाल जाहीर का केला जात नाही?, याबाबत आम्ही आयोगाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला; परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. विचारणा केली असता, "तुम्हाला एवढी घाई का आहे? काम नसेल, तर शेती करा', असे शब्द ऐकविले जातात, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

Web Title: mpsc result pending