गैरसोयीचा ‘शॉक’

प्रसाद पाठक
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचे प्रकार वाढले असतानाच चुकीचे रीडिंग, भरमसाट बिल आणि कधी बिलच न मिळणे अशा प्रकारामुळे ‘महावितरण’च्या कारभाराचा ‘शॉक’ नागरिकांना बसत आहे. या तक्रारी सोडविणे राहूदेच, पण त्या समजावून घेण्याचे सौजन्यही कर्मचारी दाखवत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.  

पुणे - वीजपुरवठा अचानक खंडित होण्याचे प्रकार वाढले असतानाच चुकीचे रीडिंग, भरमसाट बिल आणि कधी बिलच न मिळणे अशा प्रकारामुळे ‘महावितरण’च्या कारभाराचा ‘शॉक’ नागरिकांना बसत आहे. या तक्रारी सोडविणे राहूदेच, पण त्या समजावून घेण्याचे सौजन्यही कर्मचारी दाखवत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.  

महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार विजेच्या पुरवठ्या संदर्भातील तक्रारींपेक्षाही वाढीव बिलांच्या ११ हजार ६०२ तर चुकीचे मीटर रीडिंग घेतल्याच्या ५ हजार ५७५ तक्रारी आल्या आहेत. केंद्रांतर्गत औरंगाबाद, बारामती, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे येथील तक्रारी स्वीकारण्यात येतात. या सात परिमंडलांतून एक जानेवारी २०१४ ते ३१ मार्च अखेरपर्यंत २३,१९,१२९ तक्रारी आल्या आहेत. एक जानेवारी २०१४ पासून ते ३१ मार्च २०१७ पर्यंत या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींपैकी किती सोडविल्या याची नोंद मात्र ‘महावितरण’कडे नाही. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला. खोटे बोलणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्यांनी केलेल्या कानउघडणीनंतर तरी परिस्थिती बदलणार का, असा प्रश्‍न आहे.

काय आहेत तक्रारी?
प्रामुख्याने विजेचे बिल वेळेत दुरुस्त न करणे, मीटर वेगाने पळणे, बिल भरूनही मीटर काढून नेणे, बिल न मिळणे, एकाच वेळी अनेक ग्राहकांना जादा आकाराची बिले पाठविणे, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळणे, एखाद्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लागणे, यांसारख्या या तक्रारी आहेत.

दखलच नाही! 
तक्रारींचे निराकरण वेळेत होत नाही, म्हणून सामान्य ग्राहक मात्र त्रस्त झाला आहे. पुष्कळ वेळेला वारंवार विचारणा केली तरीही तक्रारींना दाद मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक महसूल मिळवून देण्यातही पुणे परिमंडल आघाडीवर आहे. तरीही तक्रारी का वाढत आहेत, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. 

महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे तक्रार करण्याची सुविधा आहे. तांत्रिक बिघाड असो, की वीजबिलांच्या तक्रारी असोत त्यांचे निराकरण करण्याचा महावितरणचा सातत्याने प्रयत्न असतो. तांत्रिक बिघाड, वीजबिलांसंबंधीच्या तक्रारींचे प्रमाण काही वर्षांत तुलनेने कमी झाले आहे.
- रामराव मुंडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

प्रसंग १
दर महिन्यात चारशे ते साडेचारशे बिल येणाऱ्या सदाशिव पेठेतील एका ग्राहकाला या महिन्यात तब्बल पाच हजार रुपये बिल आले. याची तक्रार केल्यावर दोन दिवसांनी या मग बघू, असे उत्तर त्यांना देण्यात आले.

प्रसंग २
पद्मावती भागात वीजबिल न भरल्याने दोन कर्मचारी मीटर काढून घेण्यासाठी आले. वारंवार मागणी करूनही बिलच न मिळाल्याने ते भरू शकलो नाही आणि लगेच भरण्यास तयार आहे, असे सांगूनही त्यांचा मीटर काढून नेण्यात आला.

पुणे परिमंडल
(एक जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०१७) 
एकूण २४,८४७ तक्रारींपैकी नादुरुस्त मीटर, चुकीचे रीडिंग, मुदतीत वीजबिल न मिळणे, जादा रकमेचे बिल येणे अशा तक्रारींचे प्रमाण ५६ टक्के आहे.

Web Title: Mseb issue