लॉकडाऊनचा परिणाम; कुंभार व्यावसायिकांच्या डोळ्यात तरळले पाणी!

Kumbhar-Aaji
Kumbhar-Aaji

जुनी सांगवी : उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेला थंड पाण्याचा माठ गोरगरीबांची तहान भागवतो. थंड पाण्याबरोबरच माठातील पाण्याची चव निराळी असल्याने प्रत्येकाच्या घरात उन्हाळ्यात माठ पाहायला मिळतो. मात्र, सध्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहक नसल्याने कुंभार व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे.

सध्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरम काळ्या चहाची क्रेझ वाढल्याने शीतपेय कुटुंबातून जवळपास हद्दपार झाली आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाच्या चटक्यासोबत माठ खरेदीकडे नागरीकांचा ओढा असतो. मात्र लॉकडाऊनमुळे ग्राहक मंदावल्याने जुनी सांगवी कुंभारवाड्यात शुकशुकाट आहे. जुनी सांगवीत सुमारे दहा ते पंधरा कुटुंबे या व्यवसायात आहेत.

गणेशमूर्तीपासून ते सर्व सण-उत्सवात लागणारे साहित्य जुनी सांगवीतून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विकले जाते. मात्र, सध्या तयार परराज्यातून मागवलेला मालही धूळखात पडून असल्याने कुंभार व्यावसायिकांसमोर तोटा सहन करून उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा राहिला आहे. रसवंतीगृह, पाणपोईसाठी लागणारा शंभर लीटरपासून दीडशे लीटरपर्यंतचा सातशे ते एक हजार रूपये किमतीचे रांजण ग्राहकाविना पडून आहेत. हा हंगाम असाच गेल्यास मोठ्या रांजणातील गुंतवणुकीचा तोटा वर्षभर सहन करावा लागणार आहे.

जयपूर, राजस्थान, गुजरात या परराज्यातून नक्षीकाम केलेले मोठे माठ ग्राहकाविना पडून आहेत. नक्षीकाम असल्याने या माठांना मोठी मागणी असते. उन्हाळ्यात दही-दुधासाठी लागणारी छोटी मडकी, जेवणासाठी लागणारी मातीची भांडी, कढई, कटोरी, ताट, पेला, उलातणे, थंड पाण्यासाठी प्रवासात वापरता येईल अशी मातीची बाटली अशा उन्हाळ्यात प्रचंड मागणी असलेल्या वस्तू खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

गुंतवलेले भांडवलही निघाले नसल्याने हंगाम संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न कुंभार व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. काहीअंशी फिरकणारा मध्यमवर्गीय ग्राहकही कमी दराने वस्तूंची मागणी करू लागल्याने सांभाळून ठेवण्यापेक्षा ग्राहक मागेल, त्या भावात विक्री केली जात आहे.

'सध्या रसवंतीगृह पाणपोईसाठी लागणारे मोठे रांजण,राजस्थानी नक्षीकाम असलेले माठ,जेवणासाठी लागणारी मातीची भांडी असा साठ ते सत्तर हजाराचा माल पडून आहे.यात पन्नास हजाराचे मोठे रांजण पडून आहेत.
- कुसूमबाई कुंभार, जुनी सांगवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com