‘मुळा-मुठा’ शुद्धीकरण २०२० पर्यंत पूर्ण - कुणाल कुमार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - ‘‘जपानच्या ‘जायका’कंपनीतर्फे मिळणाऱ्या निधीतून मुळा-मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी हाती घेतलेली विविध कामे २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येतील,’’ असा विश्‍वास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केला. शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवनासाठी महापालिका वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - ‘‘जपानच्या ‘जायका’कंपनीतर्फे मिळणाऱ्या निधीतून मुळा-मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी हाती घेतलेली विविध कामे २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येतील,’’ असा विश्‍वास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केला. शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवनासाठी महापालिका वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे आयोजित नदीसुधार कार्यशाळेत ते बोलत होते. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मुकेश कुमार सिन्हा, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, पत्रकार अभिजित घोरपडे, दीपक जाधव हे उपस्थित होते. 

कुमार म्हणाले, ‘‘नदी सुधारणेबद्दल प्रशासन अतिशय संवेदनशील आहे. जायकाअंतर्गत गंगा नदीनंतर सर्वाधिक निधी मुळा- मुठा नदीसाठी देण्यात आला आहे. हा निधी मिळाल्यानंतर सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, नवीन वाहिन्या बसविणे, मैला शुद्धीकरणाच्या अकरा केंद्रांची उभारणी करणे अशी कामे पूर्ण करून नदी शुद्धीकरण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.’’  

प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी नदीपात्रात असलेल्या घरांची समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. सिंचन, पर्यावरण, भूमिअभिलेख अशा सुमारे १७ विभागांच्या परवानग्या आवश्‍यक आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणेही गरजेचे आहे. त्यामुळे नदीबद्दलच्या प्रत्यक्ष कामांना उशीर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सिंह म्हणाले, ‘‘नदी सुधारणा म्हणजे केवळ तिचे सुशोभीकरण नव्हे, तर नदी स्वच्छ आणि नेहमी प्रवाही राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. तिच्या मूळ रूपात हस्तक्षेप वाढल्यामुळेच नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वप्रथम नदीमध्ये होणारे बांधकाम, नवीन योजना, याद्वारे होणारा हस्तक्षेप रोखला पाहिजे. तसेच नद्यांची जमीन ही केवळ नद्यांसाठीच राखीव ठेवली पाहिजे.’’

जायकाअंतर्गत मिळणाऱ्या निधीबद्दल कुमार म्हणाले, ‘‘नदीसुधार प्रकल्पासाठी जायका कंपनीने केंद्र सरकारला कर्ज दिले आहे. केंद्र सरकार हा निधी अनुदान रूपात महापालिकेला देणार असल्यामुळे महापालिकेवर या निधीचे कोणतेही कर्ज असणार नाही. त्यामुळे त्याची परतफेड करावी लागणार नाही.’’

मेट्रो नदीपात्रातून नको - राजेंद्र सिंह 
‘‘नदीसुधारणेबद्दल संवेदनशील असल्याचे महापालिका सांगते. परंतु एकीकडे मोठमोठे ‘बजेट’ जाहीर करते आहे. त्याचवेळी शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘मेट्रो’ नदीपात्रातून नेण्यात येणार आहे. यामुळे नदीचे मूळ स्वरूप आणि तिच्या जैवविविधतेवर परिणाम होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग नदीपात्रातून नसावा,’’ असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

Web Title: mula-mutha refineries to meet 2020