मुळा-मुठा नद्या करणार कचरामुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुळा-मुठा नदीच्या पात्रातील प्लॅस्टिक, कचरा काढून नद्या कचरामुक्‍त करण्यात येणार आहेत. येत्या 26 आणि 27 मे रोजी सकाळी हे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा सहभाग राहील, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

पुणे - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुळा-मुठा नदीच्या पात्रातील प्लॅस्टिक, कचरा काढून नद्या कचरामुक्‍त करण्यात येणार आहेत. येत्या 26 आणि 27 मे रोजी सकाळी हे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा सहभाग राहील, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक प्रशिक्षण आणि वन संवर्धनाबाबत जागृती करणे हा यामागील उद्देश आहे. दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षी देशातील सागरी किनारे आणि नद्यांच्या पात्रात साचलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे निर्मूलन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत केंद्र सरकारकडून राज्यातील पुणे, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मुळा-मुठा नदीपात्रात साचलेले प्लॅस्टिक आणि कचरा काढण्यात येणार आहे.

या मोहिमेचा प्रारंभ सोमवारी येथील वन भवनात जैवविविधता आणि नदी संवर्धन या विषयांवरील कार्यशाळेद्वारे करण्यात आला. पर्यावरण मंत्रालयाचे संचालक सलाउद्दीन, सहसंचालक डॉ. सुब्रमण्यम, सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, वनसंरक्षक डॉ. विवेक खांडेकर या वेळी उपस्थित होते.

26 आणि 27 मे (सकाळी 7 ते 10) - नदीकिनारी स्वच्छता अभियान
5 जून (सकाळी 7 ते 10) - मुळा-मुठा नदीकाठाची स्वच्छता, पथनाट्य व चित्ररथ
5 जून (सकाळी 7 ते 10) - समारोप कार्यक्रम, ओंकारेश्‍वर मंदिर

पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. पर्यावरण संतुलित असेल तर आपले जीवन सुरक्षित होईल. सर्व नागरिकांच्या सहभागातून हे स्वच्छता अभियान यशस्वी होईल.
- डॉ. दिनेशकुमार त्यागी, मुख्य वनसंरक्षक

कचऱ्याची समस्या संपवायची असेल तर कचरानिर्मिती कमी कशी होईल, यासाठी काम करण्याची गरज आहे. हे काम लोकसहभागाशिवाय अशक्‍य आहे.
- गीता कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ

Web Title: mula mutha river garbage free