
मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द गावांना जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील पुलाला लागून केशवनगर-खराडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जलपर्णी विस्तारली आहे.
मांजरी - शहरातून येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील दूषीत पाण्यामुळे येथील मुळामुठा नदीपात्रावर जलपर्णीचे साम्राज्य वाढले आहे. नदीवरील जलपर्णीचा हा विळखा दिवसेंदिवस विस्तारू लागला असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील गावांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द गावांना जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील पुलाला लागून केशवनगर-खराडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जलपर्णी विस्तारली आहे. तिच्या वाढीचा वेग मोठा असल्याने गेल्या काही दिवसातच तिचा विस्तार दूरवर वाढला आहे. पुलाला अडकल्यामुळे त्याखालील भागात जलपर्णीचे प्रमाण कमी आहे. मात्र, भविष्यात येथेही तिचा विस्तार होण्याचा धोका आहे. सध्या परिसरात जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सायंकाळच्या सुमारास नदी पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना या डासांचा सामना करावा लागत आहे. गावातही डासांची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा या गावांमधील तरूण कार्यकर्त्यांनी यंत्राद्वारे व कधी होडीतून जाऊन जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तिचा संपूर्ण बिमोड होऊ शकलेला नाही. शहर परिसरातूनही वेळोवेळी जलपर्णी काढून पुढे वाहत्या पात्रात सोडून दिली जाते. त्यामुळेही येथील जलपर्णीत वाढ होत आहे. परिसरातील ग्रामपंचायती, पालिका व लघुपाटबंधारे खात्याने ही समस्या सोडविण्याबाबत गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.